टेंभुर्णी – सापटणे परिसरातील पाण्याच्या तीव्र टंचाईच्या पार्श्वभूमीवर आज उजनी धरण उपविभागीय अभियंता, टेंभुर्णी यांना शेतकरी बांधवांच्या वतीने तातडीचे निवेदन देण्यात आले. सापटणे, तांबवे, वेगेगाव या गावांतील हजारो हेक्टरवरील ऊस पिक पाण्याअभावी जळू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
सध्या सापटणे तलाव पूर्णपणे कोरडा पडला असून गावकरी व जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत आहे. शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरूनही शासनाकडून पाणी सोडले जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ही बाब शेतकऱ्यांवर उघड अन्याय असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
भाजपा ॲग्रीकॉस किसान मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तसेच तांबवे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मा. राजाभाऊ खटके-पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा प्रतिनिधीमंडळाने उपविभागीय अभियंत्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, निमगाव तलावातून ओव्हरफ्लो पाणी तसेच DY-2 शिडशिंगे व DM-4 पिंपळनेर येथून मोठ्या दाबाने पाणी सोडून सापटणे तलाव तातडीने पूर्ण क्षमतेने भरून द्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, मागणीची तातडीने दखल न घेतल्यास हजारो शेतकऱ्यांसह उजनी धरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. संभाव्य परिस्थितीस शासन जबाबदार राहील, असा ठाम इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
या निवेदनामुळे प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता असून, पाणीप्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

























