मंगळवेढा – शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे एटीएम वर चोरट्यांनी दरोडा टाकून 7 लाख 72 हजार 900 रुपये रक्कम पळवून नेण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान मागील 15 दिवसात माचणूर,रहाटेवाडी,सिध्दापूर,बोराळे व दामाजीनगर या भागात चोरट्यांनी घरफोड्या केल्या.मात्र या मधील एकाही चोराला पकडण्यात पोलीसांना यश न आल्यामुळेच चोरट्यांचे बळ वाढत असून दिवसेंदिवस चोर्यांच्या घटनेत वाढ होत असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,दि.7 मे च्या पहाटे 3 वाजता शहरातील शनिवार पेठेत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियातील एटीएम मशीन अज्ञात चोरट्याने गॅस कटरच्या सहाय्याने तोडून फोडून मशीनच्या ट्रे मध्ये ठेवलेले 7 लाख 72 हजार 900 रुपये चोरुन घेवून गेले आहेत. या दरम्यान कटरच्या सहाय्याने मशीन तोडताना एटीएम मशीन,एसी.सी.सी.टी.व्ही कॅमेरे यांना आग लागून नुकसान झाल्याचे असिस्टंट बँक मॅनेजर भिकाजी बिमकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान मंगळवेढा शहरातील दामाजीनगर हद्दीत,बोराळे,माचणूर,रहाटेवाडी,सिध्दापूर आदी ठिकाणी चोरटयांनी घरफोड्या करुन रोख रक्कम व सोन्याचे दागीने चोरुन नेल्याच्या घटना घडल्या आहेत. शेतकर्यांच्या शेळ्याही चोरीला गेल्या आहेत.
या घटनामधील आत्तापर्यंत पोलीसांना चोर पकडण्यात अपयश आल्याने चोरट्यांची हिंमत दिवसेंदिवस वाढत जावून चोरीच्या घटनेमध्ये भर पडत असल्याने मंगळवेढ्याला सक्षम अधिकार्याची गरज भासत असल्याच्या भावना सुज्ञ नागरिकामधून व्यक्त होत आहेत. येथे डी.वाय.एस.पी. दर्जाचे अधिकारी असतानाही चोरीची मालिका का संपत नाही? असाही सवाल विचारला जात आहे. जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी मंगळवेढ्यात गांभीर्याने लक्ष घालून भविष्यात चोर्या होणार नाहीत व झालेल्या चोर्यांचा वेगाने तपास करुन चोरटे जेरबंद करावेत अशी मागणी होत आहे.
पोलीसांनी सदर घटनेनंतर ग्रामसुरक्षा यंत्रणेवरुन मंगळवेढ्यात दरोडेखोर आले असून ते सोलापूर रोडने वाहनातून गेले आहेत. नागरिकांनी जागरुक रहावे असे आवाहन केल्यामुळे नागरिकांनी रात्र अक्षरश: जागून काढली.
शहरातील शनिवार पेठेमधील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडल्याचे छायाचित्रात दिसत आहे.


























