वेळापूर – माळशिरस येथील पोलिस स्टेशन हद्दीत सांगोला रोड येथील घुमेरा ओढ्यानाजिक झालेल्या आयशर टेम्पो व दुचाकीच्या अपघातात शेरी येथील तानाजी शहाजी माने देशमुख व त्यांची पत्नी जयश्री तानाजी माने देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार दि 15 मे रोजी सायंकाळी 6 वाजल्याच्या सुमारास घडली.
प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार आयशर टेम्पो क्रमांक एम एच 10 एडब्लू 4670 ने दुचाकीवरून जात असणाऱ्या तानाजी माने देशमुख व त्यांची पत्नी जयश्री माने देशमुख यांना पाठीमागून धडक दिली यात पती पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले दरम्यान उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
वेळापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले व रात्री उशिरा शेरी नंबर 1 येथील राहत्या घरी अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान वेळापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून आयशर टेम्पो व चालक यांना ताब्यात घेतले असून वेळापूर पोलिसात रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
























