टेंभुर्णी – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६९ व्या जयंतीनिमित्त टेंभुर्णी नगरीत उत्सव मोठ्या उत्साहात, जल्लोषात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त संभाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम म्हणून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास टेंभुर्णी शहरासह पंचक्रोशीतील युवक-तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन सहायक पोलीस अधीक्षक (भा.पो.से.) तथा प्रभारी अधिकारी, टेंभुर्णी पोलीस ठाणे मा. राहुल आत्राम यांच्या शुभहस्ते पार पडले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. सुरज भैय्या देशमुख यांनी भूषवले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आयपीएस अधिकारी राहुल आत्राम म्हणाले की, “छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार व आचार समाजासाठी प्रेरणादायी आहेत. सर्व शिवभक्तांनी तसेच समाजातील तरुणांनी केवळ जयंती उत्सव साजरा करण्यापुरते मर्यादित न राहता त्यांच्या विचारांचे आचरण करून समाजोपयोगी कार्यात सहभागी व्हावे. रक्तदानासारख्या उपक्रमांद्वारे मानवतेची सेवा करणे हीच खरी थोर पुरुषांना आदरांजली आहे. आज युवकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे, त्याचे अनुकरण इतरांनी करावे.”
या कार्यक्रमास संभाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, युवक व नागरिकांनीही सक्रिय सहभाग नोंदवला.
रक्तदान शिबिरासाठी वैद्यकीय पथकाने मोलाचे सहकार्य केले. रक्तदात्यांची नोंदणी, आरोग्य तपासणी व रक्तसंकलनाची संपूर्ण प्रक्रिया शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश देत युवकांनी समाजाप्रती आपली बांधिलकी जपली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संभाजी महाराज स्मारक समितीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व युवकांनी विशेष परिश्रम घेतले. छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला हा समाजोपयोगी उपक्रम टेंभुर्णी शहरात चर्चेचा विषय ठरला असून आयोजकांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

























