बार्शी – शहरात गुरुवार दि. १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील विविध सार्वजनिक मंडळे, सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या जयंतीनिमित्त आमदार दिलीप सोपल, माजी आमदार राजेंद्र राऊत, नगराध्यक्षा तेजस्विनी कथले, पंचायत समिती सभापती मीनाक्षी रोंगे, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, योगेश सोपल, गणेश जाधव, विजय राऊत, रणवीर राऊत, कृष्णराज बारबोले, अभिजीत राऊत, उज्वला सोपल, कविता राऊत, ॲड. राजश्री तलवाड-डमरे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
छावा प्रतिष्ठानचा सामाजिक संदेश देणारा अनोखा उपक्रम
छावा प्रतिष्ठान यांच्यावतीने यंदा छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त विशेष सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. बार्शी शहरातील राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, शासकीय, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रातील महिलांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीला दुग्ध व जलाभिषेक करण्यात आला. तसेच संभाजी महाराज लिखित ‘बुधभूषण’ ग्रंथाचे पूजन करण्यात आले.
स्त्रियांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांविरोधात जनजागृती व्हावी या उद्देशाने महिला अत्याचारावर आधारित देखाव्याचे सादरीकरण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी नगराध्यक्षा तेजस्विनी कथले, पंचायत समिती सभापती मीनाक्षी रोंगे, कविता राऊत, ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षिका शीतल बोपलकर आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सायंकाळी शिवसृष्टी समोर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिके करण्यात आली. यामध्ये मावळ्यांच्या वेशभूषेत मुलांनी व नऊवारी साडी नेसून मुलींनी तलवारबाजी, भाला-काठ्या, दांडपट्टा इत्यादी शिवकालीन मर्दानी खेळांचे यशस्वी प्रात्यक्षिके करून प्रदर्शन केले.
पारंपारिक वाद्यांसह पदयात्रा
छावा प्रतिष्ठानच्यावतीने सायंकाळी ६ वाजता शहरातील प्रमुख मार्गांवरुन पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात निघालेल्या या पदयात्रेत वारकरी संप्रदायातील लहान मुले-मुली हातात टाळ घेऊन सहभागी झाल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्ययक्रम यशस्वी करण्यासाठी छावा प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
मराठा सेवा संघाच्यावतीने सार्वजनिक वाचनालय सुरु —
मराठा सेवा संघ बार्शी शहर व तालुक्याच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त “छत्रपती संभाजी महाराज सार्वजनिक वाचनालय” सुरु करण्यात आले. याचे उद्घाटन भाजपा युवा मोर्चाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष ॲड. रणवीर राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा तेजस्विनी कथले, सभापती मीनाक्षी रोंगे, डॉ. संजय अंधारे, नारायण जगदाळे, संतोष मोळवणे, जिल्हाध्यक्ष डॉ. गोरख देशमुख, जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा उज्ज्वला साळुंखे,किरण गाढवे, रावसाहेब यादव, माधवराव देशमुख, प्रा. कल्याण घळके, प्रशांत कथले, प्रशांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

























