सोलापूर – भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या अध्यक्षा तथा पंचायत समिती सदस्या अंबिका पाटील यांनी केंद्रीय रस्ते व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना निवेदन सादर करून महिलांसाठी उद्योग प्रशिक्षण, आर्थिक सहाय्य व बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबाबत विविध मागण्या मांडल्या.
निवेदनामध्ये प्रत्येक जिल्ह्यात महिला उद्योजकता प्रशिक्षण केंद्र सुरू करणे, महिला बचत गट व नवउद्योजक महिलांसाठी सुलभ कर्ज योजना उपलब्ध करणे, राष्ट्रीय महामार्ग परिसरातील फूड प्लाझा, कॅफे व स्थानिक उत्पादन विक्री केंद्रांमध्ये महिला बचत गटांना प्राधान्य देणे, ग्रामीण भागात महिला उद्योग क्लस्टर उभारणे तसेच महिला उत्पादनांसाठी ऑनलाइन विक्री सुविधा उपलब्ध करून देणे अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
याशिवाय कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना रोजगार व उद्योग सुरू करण्यासाठी विशेष मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्याचीही मागणी करण्यात आली. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केल्यास देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळेल तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर स्वयंरोजगार निर्माण होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
केंद्रियमंत्री गडकरी यांनी निवेदनाची दखल घेत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी आमदार सुभाष देशमुख, शहराध्यक्ष रोहीणी तडवळकर, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर , सुधा अळ्ळीमोरे व दक्षिण सोलापूर तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.


























