पंढरपूर – जागतिक युद्धाची परिस्थिती आणि त्यामुळे उद्भवू शकणारी संभाव्य इंधन टंचाई लक्षात घेता, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनाला येथील श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीने अनोखा प्रतिसाद दिला आहे.शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत पंढरपूरात मंदिर समितीच्या सहअध्यक्षांसह इतर सर्व सदस्य आता शासकीय किंवा खासगी चारचाकी वाहनांचा त्याग करून केवळ ई-रिक्षा वापरणार आहेत. या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
देशातील इंधन साठ्याचा विचार करता भविष्यातील टंचाई टाळण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने जनतेला इंधन बचतीचे आवाहन केले आहे. या मोहिमेत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत, इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी मंत्रालयात मोटारसायकलवरून जाऊन एक नवा आदर्श घालून दिला आहे. याच कृतीतून प्रेरणा घेऊन मंदिर समितीने देखील आपल्या कार्यपद्धतीत बदल करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
दरम्यान नेहमीच व्हीआयपी गाड्यांच्या ताफ्यात वावरणाऱ्या मंदिरे समिती सदस्यांनी पंढरपूर शहरात सामान्य ई-रिक्षाचा पर्याय स्वीकारल्याने प्रशासकीय वर्तुळात देखील याची चर्चा आहे. राष्ट्राची संपत्ती मानून तिचा अपव्यय टाळण्यासाठी हा निर्णय इतर संस्थांसाठीही दिशादर्शक ठरणारा असा आहे.
———-
चौकट : ( सहअध्यक्ष आले पायी चालत )
येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज ओसेकर यांचा प्रदक्षिणा रोडच्या आतील बाजूस चंद्रभागा नदीच्या उध्दव मंदिराच्या बाजूला ओसेकर मठ आहे. सहअध्यक्ष पंढरपूरात आले की त्या ठिकाणी वास्तव्यास असतात. एरव्ही मंदिर समितीच्या बैठकीस किंवा विठ्ठल मंदिरात जाताना ते स्वत:ची किंवा मंदिर समितीच्या चारचाकी गाडीचा वापर करतात. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून चारचाकीक गाडी सोडून चक्क ते विठ्ठल मंदिरा पर्यंत पायी चालत दाखल झाले. या पुढे देखील पुढील शासन आदेश येईपर्यंत पंढरपूरात वास्तव्यास असताना आपण मंदिर समितीच्या ई रिक्षाचा वापर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


























