माढा : माढ्यातील उपळाई खुर्द भागातील पाणंद (शिव) रस्ता खुला करून देण्याच्या मागणीसाठी शुक्रवार १४ ऑगस्ट रोजी माढा तहसील कार्यालयासमोर मंगल कदम, कांताबाई खेडकर, वंदना चांगभले, शांता चवरे, सुवर्णा माळी,हौंसाबाई भांगे,
मालन कदम,जनाबाई कदम,
लता जाधव या शेतकरी महिलांनी आमरण उपोषण केले.
यासंदर्भात प्रशासनास ५ ऑगस्ट रोजी निवेदन दिले होते. त्या निवेदनात असे म्हटले होते की आम्ही माढा तहसिलदार यांच्याकडे २ वर्षापासून उपळाई खुर्द पाणंद शिव रस्त्यावरील अतिक्रमण काढून तो रस्ता खुला करुन देणे बाबत अनेक वेळा अर्ज देऊन विनंती केली परंतु अद्याप शिव रस्ता खुला करुन दिलेला नाही. प्रत्येक वेळी आम्हाला रस्ता खुला करणेबाबत फक्त आश्वासन देण्यात आले आहे.त्यामुळे आम्ही रस्ते संबंधी सर्व शेतकरी १४ ऑगस्ट २०२६ रोजी तहसील कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण करणार असल्याचे म्हटले आहे.तसेच पुढील होणाऱ्या सर्व परिणामास सर्वस्वी आपले प्रशासन जबाबदार राहील असे ही यात नमुद करण्यात आले आहे. या उपोषण स्थळी तहसीलदार संजय भोसले यांनी भेट देऊन महिला शेतकऱ्यांना उपोषण सोडण्यासंदर्भात विनंती केली परंतु आंदोलकांनी आजच आम्हाला रस्ता खुला करून दिला तर आम्ही उपोषण मागे घेऊ अन्यथा या ठिकाणावरून उठणार नसल्याची भूमिका घेतल्यामुळे तहसीलदारांनी मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकारी भुमिअभिलेख विभाग व पोलीस प्रशासनास स्थळ पाहणीची सुचना करून तात्काळ अहवाल देण्याच्या सूचना करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. व आंदोलकांना पत्राद्वारे आमच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणची पाहणी केली असून सदरचे प्रकरण अर्धन्यायीक या कार्यालयात न्याय प्रविष्ट आहे.या प्रकरणाचा आदेश तातडीने करण्यात येईल.असे आश्वस्थ केले असल्याने शेतकऱ्यांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. या उपोषण स्थळास माढा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा ॲड मिनल साठे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती शिवाजीराजे कांबळे यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून तहसीलदार भोसले यांच्याबरोबर चर्चा केली.
यावेळी नगरसेवक नाना साठे अनिकेत चवरे अण्णा शिवपुजे सुरेश कदम आदी नागरिक उपस्थित होते.
Post Views: 4