सोलापूर : ” आमच्या घराचे भांडण सोडवणारा तु कोण ?” असे म्हणत एका तरुणावर लोखंडी सळई आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना रविवार पेठ परिसरात १६ मे रोजी घडली आहे. याप्रकरणी जेलरोड पोलिस ठाण्यात चौघाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश सुरेश बनसोडे, सिद्धेश्वर सुरेश बनसोडे, अभिषेक नवनाथ मोहिते आणि वैभव नवनाथ मोहिते (सर्व रा. रविवार पेठ, सोलापूर ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून याबाबत विजय राजू क्षीरसागर (रा. रविवार पेठ, सोलापूर ) यांनी फिर्याद दिली आहे .
यातील फिर्यादी विजय क्षीरसागर यांनी आरोपींचे भांडण मध्यस्थी करून ते सोडवले होते. याचाच राग मनात धरून आरोपींनी १६ मे रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास जय हॉस्पिटलसमोर विजय यांना गाठले. “तू आमच्या घराचे भांडण सोडवणारा कोण?” असे म्हणत आरोपी महेश बनसोडे याने लोखंडी सळईने विजय यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. विजय यांनी तो वार अडवल्यामुळे त्यांच्या उजव्या हाताच्या तळहाताला किरकोळ जखम झाली.
त्याच वेळी आरोपी सिद्धेश्वर बनसोडे याने कोयत्याने थेट विजय यांच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच, इतर दोन आरोपी अभिषेक मोहिते आणि वैभव नवनाथ मोहिते यांनी रस्त्यावर पडलेले फरशीचे तुकडे घेऊन विजय यांच्या दुचाकीवर मारले. यात दुचाकीच्या पेट्रोल टाकीचे मोठे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हवालदार कांबळे हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत .
Post Views: 7