सोलापूर – ”साहित्यिक, कवी, राजकारणी, शिक्षक, अधिकारी आणि नागरिक यांच्या प्रत्येक कृतीतून वैचारिकता, सहृदयता, प्रामाणिकपणा आणि समाज-देशहिताचे भान दिसले पाहिजे. आजच्या काळात केवळ संवेदनशीलता असून चालणार नाही, तर त्या संवेदनशीलतेला कृतिशीलतेची जोड मिळणे अत्यंत आवश्यक आहे,” असे प्रतिपादन हिराचंद नेमचंद वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी केले.
सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंचाच्या वतीने आयोजित सन २०२५-२६ च्या प्रतिष्ठित वार्षिक पुरस्कारांचे वितरण श्री. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात अत्यंत उत्साहात संपन्न झाले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) चे सोलापूर जिल्हाप्रमुख पद्माकर कुलकर्णी होते, तर डॉ. श्रीकांत येळेगावकर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मंचाचे अध्यक्ष फैय्याज शेख यांनी स्वागत, प्रास्ताविक केले व व्यासपीठावरील पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी अरुण धुमाळ यांच्या हस्ते पद्माकर कुलकर्णी यांचा, तर फैय्याज शेख यांच्या हस्ते डॉ. येळेगावकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या सोहळ्यात सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पाच मान्यवरांना व्यासपीठावरील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पुरस्कारार्थींचा परिचय श्रीवल्लभ करकमकर आणि धनंजय शहा यांनी करून दिला.
स्व. डॉ. मीर इसहाक शेख स्मृति पुरस्कार: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव प्रा. डॉ. शिवाजी शिंदे यांना त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक स्तरावरील उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
स्व. सुमतीबाई येळेगावकर स्मृति पुरस्कार: वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा. डॉ. नरेंद्र काटीकर आणि हिराचंद नेमचंद कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील प्रा. भीमगोंडा रामगोंडा पाटील यांना शैक्षणिक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातील सर्वस्व झोकून देण्याच्या वृत्तीबद्दल गौरविण्यात आले.
स्व. रंगनाथ लोहार साहित्य पुरस्कार: ज्येष्ठ कवयित्री वंदना कुलकर्णी यांना त्यांच्या कवितांमधून उमटणारे सामाजिक भान आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
स्व. बाबुराव धुमाळ स्मृति आदर्श कामगार पुरस्कार: व्यावसायिक क्षेत्रात काम करत असतानाच टेलरिंग व्यवसायाच्या माध्यमातून समाजाप्रती आपली बांधीलकी जपणारे ओमप्रकाश बारड यांना या आदर्श सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर पाचही मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करत मंचाचे आभार मानले.
वृत्तपत्र लेखक हा समाजाचा ‘जागल्या’ : पद्माकर कुलकर्णी
—————
अध्यक्षीय भाषणात बोलताना पद्माकर कुलकर्णी म्हणाले, “वृत्तपत्र लेखक हा समाजाचा खऱ्या अर्थाने ‘जागल्या’ असतो. जेव्हा एखादा प्रश्न प्रशासनाच्या लक्षात येत नाही, तेव्हा एका सामान्य लेखकाचे पत्र किंवा लेख त्या प्रश्नाला वाचा फोडतो. सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंचाने ही परंपरा केवळ टिकवली नाही, तर ती उत्तरोत्तर वृद्धिंगत केली आहे, याचे मला विशेष कौतुक वाटते. आजचे पुरस्कारार्थी हे विविध क्षेत्रांतील हिरे आहेत. तंत्रज्ञानाच्या युगात ‘लेखणी’ मागे पडतेय की काय असं वाटत असताना, हा मंच लेखणीची धार कायम ठेवत आहे. लेखक हा समाजाचा आरसा असतो आणि हा आरसा स्वच्छ ठेवण्याचे मोठे काम या मंचाने केले आहे.”
या दिमाखदार सोहळ्याला अशोक खानापुरे, मयुरेश कुलकर्णी, रामकृष्ण आघोर, सुनील पुजारी, प्रेमचंद मेने, विठ्ठल वठारे, मल्लिनाथ किणगी, डॉ. रामचंद्र धर्मसाले, रंगसिध्द कोरे, प्रा. गणेश लेंगरे, अनुराधा निकम, डॉ श्रुती वडगबाळकर, डॉ शिवाजीराव देशमुख, राजेंद्रसिंह लोखंडे, डॉ नभा काकडे, डॉ रामचंद्र धर्मसाले, कवी गोविंद काळे, गिरीश दुनाखे, महेजबीन मुल्ला, ॲड. अमिर बागवान यांच्यासह शहरातील अनेक साहित्यिक, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारंभाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सौ. प्रांजली मोहीकर यांनी केले, तर प्रा. अशोक म्हमाणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Post Views: 6