
23 व 24 मे रोजी डे-नाईट पद्धतीने झालेल्या या स्पर्धेत श्री गोविंदराज नगर स्पार्टन्स संघाने विजेतेपद पटकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र या स्पर्धेचे खरे वैशिष्ट्य म्हणजे मैदानावर दिसलेली खेळ भावना, मैत्री, कौटुंबिक नाती आणि एकोप्याचे दर्शन.
दोन दिवस खेळाडूंनी मोबाईल, दैनंदिन कामे, ताण-तणाव आणि धावपळीचे जीवन बाजूला ठेवत स्वतःसाठी वेळ दिला. प्रत्येकाने आपल्या संघासोबत निव्वळ खेळाचा आनंद घेतला. हार-जीत झाली, सामने रंगले, काहीवेळी वाद झाले, पण शेवटी प्रत्येकाने खेळ भावना जपत एकमेकांना मिठी मारत अभिनंदन केले.
स्पर्धेत काही सामने असे रंगले की भाऊच भावाच्या विरोधात मैदानात उतरला. काहीवेळी मुलं आपल्या बाबां आणि काकांविरोधात खेळताना दिसली. तर काही सामन्यांमध्ये बाबा आणि मुलं एकाच संघात खांद्याला खांदा लावून खेळताना पाहायला मिळाले. दोन जिवलग मित्र एकमेकांविरोधात दंड थोपटून मैदानात आमनेसामने उभे ठाकल्याचे चित्रही परिसरातील नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरले.
स्पर्धेत गोविंदराज नगर किंग्ज, विजयम, स्पार्टन्स, डेअरडेव्हिल्स, रॉयल, यंग रायडर, इलाईट वॉरियर्स आणि वीर बॉईज अशा आठ संघांचा सहभाग होता. प्रत्येक संघात प्रत्येकी आठ खेळाडूंना चिठ्ठीद्वारे विभागण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन डॉ. सुर्य प्रकाश कोठे यांच्या हस्ते करण्यात आले.
एकूण 15 लिग सामने अत्यंत चुरशीचे झाले. अंतिम सामन्यात प्रमोद मार्गम प्रायोजित स्पार्टन्स संघाने प्रथम फलंदाजी करत 5 षटकांत 38 धावांचे आव्हान उभे केले. यात नयन दोंता यांनी दोन षटकारांसह झंझावाती 20 धावा करत सामन्यात रंगत आणली. प्रत्युत्तरात रॉयल संघाला 25 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि स्पार्टन्स संघाने दिमाखात विजेतेपद पटकावले.
विजेत्या संघाला प्रभागाचे नगरसेवक प्रथमेश कोठे आणि सामाजिक कार्यकर्ते अविनाश दासरी यांच्या हस्ते चषक व रोख 3 हजार रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात आले. स्पार्टन्स संघाचे कर्णधार अमर कोलप्याक यांनी संघाचे नेतृत्व प्रभावीपणे केले.
द्वितीय पारितोषिक रॉयल संघाचे प्रायोजक अनिल गोसकी यांच्या संघाला कर्णधार रोहित संगा यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. तर तृतीय क्रमांकाचा मान किंग्ज संघाचे प्रायोजक उमेश गायकवाड यांच्या संघाने पटकावला. कर्णधार विशाल गाजूल आणि त्यांच्या संघाचाही सत्कार करण्यात आला.
स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज म्हणून नवल दोंता यांना गौरविण्यात आले, तर उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कारही प्रदान करण्यात आला. सामनावीर पुरस्कारासाठी एस. एस. मोबाईल, अशोक चौकचे संचालक गणेश तुम्मा यांच्या वतीने खास भेटवस्तू उमेश गायकवाड यांना देण्यात आली.
डे-नाईट स्वरूपात पार पडलेल्या या स्पर्धेचे पंच म्हणून राजू आणि प्रविण सोमा यांनी जबाबदारी सांभाळली. स्कोअरिंगचे काम गणेश उकरंडे यांनी केले, तर व्यंकटेश दोंता आणि ओंकार श्रीकोंडा यांनी आपल्या प्रभावी धावत्या समालोचनाने सामन्यांना रंगत आणली.
विशेष म्हणजे या स्पर्धेत परिसरातील नगरसेवक प्रथमेश कोठे, सतीश सिरसिला, सामाजिक कार्यकर्ते अविनाश दासरी, वासुदेव यलदंडी आणि अजय पोन्नम यांनी स्वतः मैदानात उतरून खेळाचा आनंद घेतला.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. तसेच डॉ. सुर्यप्रकाश कोठे, सामाजिक कार्यकर्ते अविनाश दासरी, महेश सग्गम, गणेश तुम्मा आणि चंद्रकांत दोंतूल यांचे विशेष सहकार्य लाभले.
गोविंदराज नगरमध्ये क्रिकेटच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य, कौटुंबिक जिव्हाळा आणि मैत्रीचे सुंदर दर्शन घडवणारी ही स्पर्धा परिसरातील नागरिकांच्या कायम स्मरणात राहणारी ठरली.






















