सोलापूर – सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान सन २०२५–२६ अंतर्गत श्रीमंत मानाचा कसबा गणपती प्रतिष्ठान परिसर सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर व प्रतिष्ठानच्या विश्वस्तांच्या हस्ते श्रीमंत मानाचा कसबा गणपती यांचे पूजन करून झाली. त्यानंतर प्रतिष्ठानचे ज्येष्ठ सदस्य मल्लिनाथ मुस्तारे व आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते उपस्थित करण्यात आले.

प्रतिष्ठानचे विश्वस्त बिप्पीन धुम्मा यांनी श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. परिसराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा, संबंधित विभागांशी समन्वय साधणे तसेच कामास लवकर मंजुरी मिळावी यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत या विकासकामासाठी निधी मंजूर झाला आणि प्रत्यक्ष सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास होऊन भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हा त्यामागील प्रमुख उद्देश होता. या विकासकामासाठी केलेल्या त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची उपस्थित मान्यवरांनी विशेष दखल घेत कौतुक केले.
यानंतर आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितले की, “श्रीमंत मानाचा कसबा गणपती हे सोलापूरचे आराध्य दैवत असून मंदिर परिसराचा विकास, सुशोभीकरण आणि भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानातून होणाऱ्या या कामामुळे परिसराचे सौंदर्य वाढण्याबरोबरच भाविकांसाठी अधिक स्वच्छ, सुरक्षित व आकर्षक वातावरण निर्माण होईल. विकासकामांमध्ये गुणवत्ता आणि पारदर्शकतेला प्राधान्य देत ही सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यात येतील.”
यावेळी मंडळाचे उत्सव अध्यक्ष बाळासाहेब मुस्तारे, मल्लिनाथ खुने, राजशेखर हिरेहब्बू, सुधीर थोबडे, केदार मेंगाणे, शिवानंद बुगडे, गुरुलिंग समाणे, सोमनाथ मेंगाणे, धनेश हिरेहब्बू, अमित गुंगे, बसवराज निंगदळी, पुष्कराज मेत्री, केदार कुताटे, योगीराज भोगडे, आदी उपस्थित होते.






















