सोलापूर : इंधन बचत, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने सुरू केलेल्या ‘नो व्हेईकल डे’ उपक्रमाला उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या उपक्रमाअंतर्गत दुसऱ्या सोमवारी महापौर विनायक कोंड्याल , उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे हे ई-बाईकवरून महापालिकेत आले. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त विना पवार यांनी ई-रिक्षाने महापालिकेत हजेरी लावून उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचत व पर्यावरण संरक्षणाच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिकेकडून विविध पर्यावरणपूरक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. वाढते वायू प्रदूषण, जागतिक तापमानवाढ तसेच इंधनाच्या मर्यादित वापराची गरज लक्षात घेऊन महापौर विनायक कोंड्याल यांनी ‘नो व्हेईकल डे’ हा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत महापालिकेतील सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक सोमवार ‘नो व्हेईकल डे’ म्हणून घोषित करण्यात आला आहे.
या दिवशी खाजगी व शासकीय वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहतूक, सायकल, ई-वाहने किंवा पायी कार्यालयात येण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे.
या उपक्रमाला पाठिंबा दर्शवत अतिरिक्त आयुक्त विना पवार यांच्यासोबत आरोग्याधिकारी राखी माने यांनीही ई-रिक्षाने महापालिकेत प्रवेश केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः कृतीतून संदेश दिल्याने कर्मचाऱ्यांमध्येही सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, सोलापूर महानगरपालिकेने शहरातील नागरिकांनीही या उपक्रमात सहभागी व्हावे, पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावावा आणि इंधन बचतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले आहे.
Post Views: 4