सोलापूर – महानगरपालिका हद्दीतील सलगरवाडी परिसरात चोपन्न मीटर रोडलगत असलेल्या सुमारे ८ हेक्टर शेतजमिनीतील ३० ते ५० वर्षे वयाची पिंपळ, जांभूळ, आंबा व बहुतांश लिंब जातीची तब्बल ४० ते ५० मोठी झाडे अवैधरित्या तोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्लॉटिंगसाठीजागा रिकामी करणे साठी गेल्या दहा दिवसांत ही झाडे तोडून सुमारे पाच ट्रक लाकूड विक्री केल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
सदर परिसर तिन्ही बाजूंनी कंपाउंड वॉलने बंदिस्त असून, मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याचे प्रत्यक्ष पाहणीत निदर्शनास आले. संबंधित शेतमालकाबाबत विचारणा केली असता कोणीही स्पष्ट माहिती देण्यास पुढे आले नाही.
घटनेची माहिती मिळताच उपवनसंचालक कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी महानगरपालिका उद्यान विभागाशी संपर्क साधण्यास सांगितले. उद्यान प्रमुख कोमल काशीद यांनी वृक्ष प्राधिकरण विभागातील दिलीप बेंबरे यांना माहिती देण्यास सांगितले. दिलीप बेंबरे यांनी तत्काळ स्पॉट व्हिजिट करून पाहणी करण्याचे सांगितले होते. मात्र सायंकाळपर्यंत त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
यानंतर उद्यान प्रमुख कोमल काशीद यांनी मच्छिंद्र गेंजगे व हलसंगी यांना घटनास्थळी पाठविले. महापालिका आयुक्तांशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न करण्यात आला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.महापौर विनायक कोंड्याल यांनाही सदर विषयी कल्पना दिली असता कठोर कार्यवाई महानगरपालिके कडुन होईल म्हणाले.
दरम्यान, महेश देवधर यांनी लाकूड भरलेली आयशर गाडी (क्रमांक MH 13 CJ 9047) अडवून ठेवत वनविभाग व पोलिसांना माहिती दिली. वनविभागाच्या सौ. शिंदे मॅडम तसेच पोलिसांच्या उपस्थितीत उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता.
या कारवाईवेळी कोमल काशीद, उद्यान अधीक्षक, दिलीप बेंबरे, मच्छिंद्र जमादार, सोमशंकर हलसंगी, सिद्राम बोराडे, विठ्ठल यातकर, यल्लप्पा पुजारी, मनोज सरवदे आदी उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक सुरज कोतवाल व त्यांच्या सहकाऱ्यांनीही घटनास्थळी पाहणी केली.
पर्यावरणप्रेमींमध्ये संताप
सोलापुरात सध्या उन्हाचा पारा ४४ अंशांपर्यंत पोहोचला असताना जनावरे, पशुपक्षी आणि नागरिकांना सावली देणारी मोठी झाडे दिवसाढवळ्या तोडली जात असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
“झाडे लावा, झाडे जगवा” असा संदेश शासन देत असताना अशा प्रकारे विना परवानगी वृक्षतोड होणे अत्यंत गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. संबंधित जमीनमालकावर पर्यावरण कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातून होत आहे.
वृक्षतोडीसाठी शासकीय नियम काय?
महाराष्ट्रात झाडतोडीसाठी विशिष्ट शासकीय नियम व निकष लागू आहेत. झाडाचा प्रकार, जागा आणि झाड तोडण्यामागील उद्देश यावर परवानगी अवलंबून असते. खाजगी शेतातील झाडे तोडण्यासाठी वनविभाग, तहसील कार्यालय, ग्रामपंचायत किंवा नगरपालिका यांची पूर्वपरवानगी आवश्यक असते.
अर्ज केल्यानंतर संबंधित विभागाकडून तपासणी केली जाते व आवश्यक असल्यासच परवानगी दिली जाते. वड, पिंपळ, आंबा, साग, चंदन यांसारख्या झाडांसाठी विशेष निकष लागू असतात. एका झाडाच्या बदल्यात ठराविक नवीन झाडे लावणे बंधनकारक असते.
विना परवानगी वृक्षतोड केल्यास दंड, गुन्हा दाखल होणे तसेच पर्यावरणीय नियमांनुसार कठोर कारवाईची तरतूद आहे. प्लॉटिंगसाठीदेखील नॉन-अॅग्रीकल्चर (NA), ले-आउट मंजुरी आणि पर्यावरणीय अहवाल आवश्यक असतो.
याविषयी आजच्या ठळक घडामोडी.
सलगरवाडीत ५० झाडांची अवैध कत्तल !
प्लॉटिंगसाठी ५ ट्रक लाकूड विक्रीचा आरोप
वनविभाग, महापालिका व पोलिसांची संयुक्त कारवाई
लाकूड भरलेली आयशर गाडी जप्त
पर्यावरणप्रेमींकडून कठोर कारवाईची मागणी.
सोलापूरात सद्या खूप उष्णता आहे. दुपारी 11 नंतर घराबाहेर पडणे मुश्किल आहे.माझ्या परिसरात जर असे झाले असेल तर ते खूपच चुकीचं आणि वेदनादाई आहे.आम्ही आमच्या प्रभागात जागा उपलब्ध असलेल्या ठिकाणी नविन झाडे लावण्याचे काम कित्येक वर्षांपासून करतो आहे. झाडे तोडणारे कोणीही असो विनापरवानगी झाडे तोडली असतील तर संबधितवर नियमानुसार मालक व झाडे तोडणारे कामगार यांच्यावर कडक कार्यवाही केली पाहिजे.
(फोटो.)
सौ.आरती अक्षय वाकसे
नगरसेविका (भा. ज. पा )
आज आम्ही घटनास्थळी पोहोचलो माहिती घेतली असता 10 दिवसापासून झाडी तोडली जातं आहेंत, आजतायत 4 ट्रक भरून लाकडे नेली आहेंत. आज आम्ही एक पकडला. मा. उपमहापौर देवधर मॅडम घटना स्थळी येऊन पहणी करून गेल्या आहेंत.
सोलापुरात तापमान वाढत चाललेला आहे आणि विना परवाना आपल्या शक्तीचा वापर करून अशा तोडणाऱ्या मोठ्या बिल्डरांना माफी दिली जाणार नाही याची सखोल चौकशी व्हावी अशी प्रशासनास विनंती आहे.आम्ही सर्व वृक्षप्रेमी मिळून जो पर्यंत झाडे तोडीचा छडा नाही लागला तर अधिकारी यांच्या कार्यालय समोर तीव्र आंदोलन करेल. आणि जो कोणी दोष असेल त्याच्या घरासमोर ही आंदोलन करणार आहोत.
फोटो.
डॉ. मनोज देवकर,
पर्यावरण दुत, सोलापूर.




















