सोलापूर – जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहात मंगळवारी पार पडलेल्या बांधकाम समितीच्या मासिक सर्वसाधारण सभेत ग्रामीण भागातील विकासकामे वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख पद्धतीने पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला. रस्ते, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रे यांसारख्या मूलभूत सुविधांच्या कामांचा आढावा घेताना केवळ बांधकाम नव्हे, तर पर्यावरण संवर्धन आणि शासकीय मालमत्तेची गुणवत्ता टिकवण्याबाबतही महत्त्वपूर्ण सूचना सभापती तथा उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी दिल्या.
दरम्यान, या सभेत मागील बैठकीच्या कार्यवृत्तास मंजुरी देत विविध शासकीय पत्रे, परिपत्रके आणि शासन निर्णयांचे वाचन करण्यात आले. बांधकाम विभाग क्र. १ व २ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध कामांचा एप्रिल २०२६ अखेरचा खर्च, प्रगती आणि निविदा प्रक्रियेचा विषयवार आढावा घेण्यात आला. विशेषतः ग्रामीण रस्त्यांची कामे, अंगणवाडी इमारतींचे बांधकाम आणि मंजूर विकासकामांच्या अंमलबजावणीचा वेग यावर चर्चा झाली.
सभेतील सर्वाधिक लक्षवेधी निर्णय म्हणजे शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि पशुवैद्यकीय दवाखान्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर त्यापरिसरात किमान दहा झाडे लावण्याची सूचना. विकासकामांसोबत पर्यावरण संवर्धनाचा समतोल राखण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे. याशिवाय, शाळा सुरू होण्यापूर्वी दुरुस्ती व बांधकामाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड होणार नाही, यासाठी उपअभियंत्यांना विशेष दक्षता घेण्यास सांगण्यात आले.
मंजूर झालेल्या सर्व कामांमध्ये दर्जा राखणे, निकृष्ट कामांना आळा घालणे आणि ठरले
ल्या मुदतीत कामे पूर्ण करण्याबाबतही स्पष्ट सूचना देण्यात आल्या. सभेत जिल्हा परिषदेचे स्वउत्पन्न वाढवण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबवता येतील, यावरही चर्चा झाली. ग्रामीण विकासासाठी आर्थिक स्रोत बळकट करण्याची आवश्यकता सदस्यांनी अधोरेखित केली.
या बैठकीस समितीचे सदस्य नेताजी खंडागळे, विकास बुळा, आदींसह बांधकाम विभागाचे अधिकारी, उपअभियंते आणि शाखा अभियंते उपस्थित होते. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.