बार्शी – येथील अलिपूर रोडवरील सन्मित्र हाउसिंग सोसायटीत राहणाऱ्या एका शिक्षकाच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण ४० हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशवंत म्हाप्पा दोरकर (वय ५८, रा. सन्मित्र हाउसिंग सोसायटी, अलिपूर रोड, बार्शी) हे शिक्षकी पेशात असून आपल्या कुटुंबासह येथे राहतात. शाळांना उन्हाळ्याची सुट्टी लागल्यामुळे ते गत ४ मे रोजी सकाळी ९वाजण्याच्या सुमारास आपल्या घराला कुलूप लावून कुटुंबासह मूळ गावी मंगळवेढा येथे गेले होते.
तब्बल वीस दिवसांनंतर, म्हणजेच रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास दोरकर हे बार्शी येथील आपल्या घरी परतले. यावेळी त्यांना घराच्या मुख्य चॅनेल गेटचे कुलूप उघडे असल्याचे दिसून आले. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता, बेडरुममधील लोखंडी कपाट उघडून आतील सामान अस्ताव्यस्त टाकलेले होते. कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अज्ञात चोरट्याने बंद घराची रेकी करुन कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि चोरी केल्याची त्यांची खात्री झाली.
Post Views: 7