
सोलापूर – राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेकडे हजारो डी.एड., बी.एड. व अभियोग्यताधारक उमेदवारांचे लक्ष लागले असताना, पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेला तांत्रिक व प्रशासकीय अडथळ्यांचा फटका बसत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रिक्त पदे अपलोड करण्यासाठी किमान ३० दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
सध्या पवित्र पोर्टलवर रिक्त पदे नोंदविण्याची अंतिम मुदत ३१ मे २०२६ निश्चित करण्यात आली आहे. मात्र अनेक जिल्हा परिषद शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये बिंदुनामावली पडताळणी, रोस्टर तपासणी, मागासवर्ग कक्ष मंजुरी, संचमान्यता आणि कर्मचारी माहिती अद्याप पूर्ण झालेली नाही. विशेषतः इयत्ता ११ वी व १२ वीच्या संचमान्यता अनेक ठिकाणी प्रलंबित असल्याने संबंधित शिक्षक पदांची अंतिम संख्या निश्चित होऊ शकलेली नाही.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता आणि सुरू असलेल्या जनगणना प्रक्रियेमुळे स्थानिक प्रशासनावर अतिरिक्त कामाचा ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक संस्थांना रिक्त पदांची माहिती वेळेत अपलोड करणे शक्य नसल्याचे समोर येत आहे. काही प्रशासनांनी ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जून अखेरपर्यंत वेळ लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत शिरगुर यांनी सांगितले की, “मुदतवाढ मिळाल्यास अधिकाधिक रिक्त पदांचा समावेश भरती प्रक्रियेत होईल. त्यामुळे पात्र उमेदवारांना रोजगाराच्या संधी वाढतील आणि भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक व व्यापक होईल.”
दरम्यान, जूननंतर शिक्षक भरती प्रक्रिया वेगाने राबविली जाण्याची शक्यता व्यक्त होत असून, उमेदवारांमध्येही अतिरिक्त जागांबाबत आशावाद निर्माण झाला आहे.
Post Views: 35