
सोलापूर – निलेश गायकवाड क्रिकेट ॲकॅडमी आयोजित इंटर क्लब क्रिकेट स्पर्धेत डोणगाव रोडवरील पुष्प जिमखाना मैदानावर शुक्रवारी झालेल्या सामन्यात ‘एनजीसीए वॉरियर्स’ संघाने, तर दुपारच्या सत्रात ‘एनजीसीए किंग्स’ संघाने शानदार विजय नोंदवला.
सकाळी झालेल्या सामन्यात पँथर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ७ बाद १०६ धावा उभारल्या. यात आराध्या आर. याने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. कबीर कीर्तीकर याने १३ तर श्रीकर चव्हाण याने १० धावांचे योगदान दिले. वॉरियर्स संघाकडून गोलंदाजी करताना आदित्य चटके आणि मल्हार होनमाने यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर आदित्य सुरवसे व दुर्वांक पाटील यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ‘एनजीसीए वॉरियर्स’ संघाने १९.१ षटकांत ४ बाद १०७ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले. वॉरियर्सकडून यशराज टेकाळे याने ३५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याला नकुल होनमाने (१९ धावा), आदित्य चटके (१८ धावा) आणि प्रेम निकंबे (९ धावा) यांनी चांगली साथ दिली. पँथर्स संघाकडून गोलंदाजीत शांभवी शिंदकर हिने अवघ्या १० धावांत २ बळी घेतले, तर अथर्व पाटील आणि आशिन शेख यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. या सामन्यात आदित्य चटके याला ‘सामनावीर’, आराध्या आर. याला ‘उत्कृष्ट फलंदाज’ आणि शांभवी शिंदकर हिला ‘उत्कृष्ट गोलंदाज’ म्हणून गौरवण्यात आले.
दुपारच्या सत्रात ‘एनजीसीए ईगल्स’ विरुद्ध ‘एनजीसीए किंग्स’ यांच्यात दुसरा सामना रंगला. किंग्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ईगल्स संघाने २३ षटकांत सर्वबाद १९० धावांचा डोंगर उभा केला. यात ऋग्वेद पाटील याने ७९ धावांची आणि सोहम कुलकर्णी याने ५७ धावांची उत्कृष्ट अर्धशतकीय खेळी केली. श्रवण म्हेत्रे याने १३ धावा केल्या. किंग्स कडून गोलंदाजी करताना श्रवण माळी याने २७ धावांत ३ बळी घेतले. तर विराज पांढरे, यश पवार, अभिजीत सरवदे आणि अर्जुन चटके यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
१९१ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना ‘एनजीसीए किंग्स’ संघाने अवघ्या २२.२ षटकांत ६ बाद १९४ धावा करत विजय खेचून आणला. किंग्सकडून अभिजीत सरवदे याने नाबाद ९६ धावांची मॅचविनिंग वादळी खेळी केली. कबीर कीर्तीकर याने ३४, प्रवीण बेनाळकर याने नाबाद १५ आणि आदित्य गाडे याने १३ धावा करत त्याला भक्कम साथ दिली. ईगल्स संघाकडून अनुज वाल्मिकीने ४१ धावांत ३ बळी आणि गौरव गादेकरने १६ धावांत २ बळी घेतले. या सामन्यात धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या अभिजीत सरवदे याला ‘सामनावीर’ व ‘उत्कृष्ट फलंदाज’ घोषित करण्यात आले, तर अनुज वाल्मिकी याला ‘उत्कृष्ट गोलंदाज’ म्हणून सन्मानित करण्यात आले


















