बार्शी – शहरातील विविध भागांमध्ये भरधाव वेगाने आणि कर्णकर्कश आवाज करणाऱ्या फटाका सायलेंसरयुक्त बुलेटस्वारांवर बार्शी शहर पोलिसांनी बुधवारी धडक कारवाई करत ११ बुलेट मोटारसायकलींचे मॉडिफाईड सायलेंसर जप्त करून बुलडोजरच्या साहाय्याने नष्ट केले.
अलिकडच्या काळात शहरात काही बुलेटस्वारांकडून फटाका सायलेंसरचा वापर करुन मोठ्या आवाजात वाहन चालविले जात असल्याने नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. वाढत्या ध्वनीप्रदूषणाबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत असल्याने शहर पोलिसांनी विशेष मोहीम राबवून ही कारवाई केली.
पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे व वाहतूक शाखेच्या पथकाने शहरातील श्री शिवाजी महाविद्यालय परिसर, छत्रपती शिवाजी महाराज रोड, एस.टी. स्टँड परिसर, उपळाई रस्ता, अलिपूर रस्ता, सुभाषनगर तसेच इतर गर्दीच्या भागात तपासणी मोहीम राबवली. यावेळी फटाका सायलेंसर बसविलेल्या ११ बुलेट मोटारसायकलींवर कारवाई करण्यात आली.
जप्त करण्यात आलेले सायलेंसर बुलडोजरच्या साहाय्याने नष्ट करण्यात आले. पोलिसांच्या या कारवाईचे सर्वसामान्य नागरिक, महिला वर्ग तसेच पालकांकडून स्वागत करण्यात येत असून शहरातील ध्वनीप्रदूषणाला आळा बसण्यास मदत होणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, शहरात कोणत्याही वाहन चालकाकडून मोठ्या आवाजात वाहन चालविणे, फटाका सायलेंसरचा वापर करणे किंवा महिलांना व नागरिकांना त्रास देण्याचे प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.
दरम्यान, वाहतूक पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे यांनी अशा प्रकारच्या वाहनचालकां विरोधात भविष्यात आणखी व्यापक मोहीम राबविण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि नागरिकांना त्रासमुक्त वातावरण मिळावे यासाठी अशा कारवाया पुढेही सुरु राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.