
सोलापूर – एस. व्ही. सी.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संगप्पा म्हमाणे हे 32 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले त्यानिमित्त काशी जगद्गुरु डॉ.मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृत हस्ते सपत्नीक सत्कार थाटात संपन्न झाला. प्रारंभी श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी व तपोरत्न योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. उपमुख्याध्यापक धनंजय नकाते यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आपल्या आशीर्वाचनातून काशी जगद्गुरु म्हणाले, प्राचार्य संगप्पा म्हमाणे उत्तम प्रशासक, प्रतिभाशाली व्यक्तिमत्व व स्पष्ट वक्तेपणा यांचा त्रिवेणी संगम असून एक शिस्तप्रिय मुख्याध्यापक म्हणून शाळेच्या व संस्थेच्या कार्यात एकसूत्रीपणा आणला आहे. त्यांचे हे कार्य एका दीपस्तंभाप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांना प्रेरणादायी व दिशादर्शक ठरेल असे गौरवोद्गार काढले . नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक संजय राठोड म्हणाले ,म्हमाणे सरांनी एमआयडीसी शाळेची ओळख शहरातील एक सुंदर व गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणारी शाळा म्हणून केलेली असून संस्थेची जबाबदारी ही यशस्वीरित्या पेलत असल्याचे सांगितले. सत्काराला उत्तर देताना प्राचार्य संगप्पा म्हमाणे म्हणाले, श्री बृहन्मठ होटगी शिक्षण संस्थेसारख्या एका धार्मिक व पवित्र शिक्षण संस्थेमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. काशी जगद्गुरुनी विश्वासाने माझ्यावर जी जबाबदारी सोपवली ती प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला असून यापुढेही संस्थेची सेवा करत राहणार असल्याचे सांगितले. यावेळी राज्याचे माजी शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, सहसंचालक बसवेश्वर पाटील, उपशिक्षणाधिकारी प्रकाश नांगरे, विठ्ठल ढेपे, कोषागार अधिकारी डॉ.वैभव राऊत, डाइटचे प्राचार्य नदाफ, उ.सोलापूरचे गटशिक्षणाधिकारी अविचल महाडीक, माजी गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे, विस्तार अधिकारी बापूसाहेब जमादार, गोदावरी राठोड, शेळगी केंद्राचे केंद्रप्रमुख चंद्रकांत वाघमारे आदीनी म्हमाणे सरांचे शाळेतील विविध उपक्रम, समयसूचकता, संस्थेच्या विकासासाठी घेतलेले परिश्रम, शिस्तबद्ध कार्यपद्धती, दूरदृष्टी, मूल्याधिष्ठित नेतृत्व, संस्थेच्या विविध कामाच्या संदर्भातील फाईल्स, फाईल मधील नोंदणी, परिपूर्ण कागदपत्रे, पुरावे व शासनाच्या जीआर नुसार कागदपत्रांची पूर्तता याबद्दल आपल्या मनोगतातून स्तुती केली.या कार्यक्रमास संस्थेचे विविध पदाधिकारी, विविध शाखांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका रोहिणी कल्याणशेट्टी यांनी तर पर्यवेक्षक केदार पटणे यांनी आभार मानले.





















