सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेच्या वतीने राज्यभर ‘सडेतोड वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. मोहोळ येथील हॉटेल कमांडरमध्ये रविवार दि. ७ जून २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता स्पर्धेला प्रारंभ होणार असल्याची माहिती युवासेनेचे कॉलेज कक्ष जिल्हाप्रमुख तुषार आवताडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना सचिव आमदार वरुण सरदेसाई यांच्या संकल्पनेतून ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा जिल्हास्तर, विभागस्तर आणि राज्यस्तर अशा तीन टप्प्यांत पार पडणार आहे. विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह तर सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय फेरीसाठी ‘व्हिजन महाराष्ट्र २०५०’ आणि ‘राजकारण आणि समाजकारण : युवकांची भूमिका’ हे दोन विषय निश्चित करण्यात आले असून स्पर्धकांना यापैकी कोणत्याही एका विषयावर भाषण करता येणार आहे. १८ ते ३५ वयोगटातील युवक-युवतींना स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या विचारांना व्यासपीठ मिळवून द्यावे, असे आवाहन युवासेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेला युवा सेना उपजिल्हाप्रमुख राम वाकसे, रमेश चौगुले, उपशहरप्रमुख शिवा माळी आदी उपस्थित होते.
Post Views: 27