सोलापूर – सिद्धेश्वर फाउंडेशनने ज्ञानेश्वरी पारायण आयोजित करून सोलापुरात आळंदी साकारली आहे. या पारायण सोहळ्याने संपूर्ण सोलापूर ज्ञानेश्वरमय झाल्याचे दिसते तसेच ज्ञानोबा तुकोबा हे जगाला तारणारी असून विश्वशांती मिळवून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी होय
असे गौरवोद्गार ज्ञानेश्वर माउली संस्थान आळंदीचे प्रमुख विश्वस्त श्री योगी निरंजननाथ महाराज यांनी काढले.
सिद्धेश्वर फाउंडेशन आयोजित जुळे सोलापूर येथील जामगुंडी लॉन्स येथे सुरू झालेल्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
सिद्धेश्वर फाउंडेशन सोलापूरच्या वतीने जामगुंडी लॉन्स येथे ५ जून ते १२ जून २०२६ या कालावधीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक मास पुण्यपर्वानिमित्त तसेच श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी व्यासपीठावर अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.श्री. सुधाकर इंगळे महाराज, ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व ह. भ.प. काशीनाथ सर्जे, राघवेंद्र जामगुंडी, श्री सिद्धेश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष सिद्धार्थ सर्जे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
चौकट
पारायणात ८ वर्षाचा बालक तर ८८ वर्षाच्या आजीचा सहभाग
या कार्यक्रमात ७५० भाविक असले तरी आठ वर्षाच्या चन्नवीर नागणसुरे या बालकाने पारायणात सहभाग घेऊन सर्वांचे लक्ष वेधले. तर ८८ वर्षाच्या रुक्मिणीदेवी बद्रीनारायण मालू या माऊलींनी उपस्थिती लावून तरुणांसमोर आदर्श निर्माण केल्याचे चित्र बघायला मिळाले.
चौकट
अपेक्षा ७५० पण प्रत्यक्षात ७७० उपस्थित…
या पारायण सोहळ्यास पारायण करण्यासाठी ७५० भक्त यावेत अशी अपेक्षा होती.पण सोलापूरकरांनी भरभरून प्रतिसाद देत ७७० भक्तांनी सहभाग घेऊन संयोजकांचा उत्साह वाढविला आहे.
– गुरुलिंग कन्नुरकर, ज्ञानेश्वरी पारायण समिती प्रमुख





















