
वैराग – सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि करमाळा निर्भया पथकाने एक मोठी संयुक्त कारवाई करत मालवंडी (ता. बार्शी) येथे घरामध्ये आणि गोदामात (गोडाऊन) साठवून ठेवलेला ७० हजार १३० रुपये किमतीचा विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखू जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, श्रीमती अंजना कृष्णा (सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, करमाळा विभाग, अतिरिक्त कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी) यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, मालवंडी गावच्या हद्दीत एका घरात मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा बेकायदेशीर साठा लपवून ठेवण्यात आला आहे.
निर्भया पथकाची संयुक्त कारवाई
माहिती मिळताच श्रीमती अंजना कृष्णा मॅडम यांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाखाली करमाळा व बार्शी निर्भया पथकाने दि. ४ जून २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजण्याच्या सुमारास मालवंडी येथील संबंधित घरावर आणि गोदामावर अचानक छापा टाकला. या छाप्यात वेगवेगळ्या कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि पानमसाला असा एकूण ७०,१३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी मुद्देमालासह आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात आणले.
गुन्ह्याची संक्षिप्त माहिती व कायदेशीर कलमे:
आरोपीचे नाव: मेहबूब जवाहर आतार (वय ३४ वर्षे, रा. मालवंडी, ता. बार्शी, जि. सोलापूर).
फिर्यादी: उत्कर्षा मुकुंद एखंडे (वय २९ वर्षे, सरकारी नोकरी – सहाय्यक आयुक्त कार्यालय, अन्न व औषध प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर).
दाखल गुन्हासंदर्भात कायदेशीर कलमे: बार्शी तालुका पोलीस ठाणे भाग ६, गु.र.नं. १७३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २२३, २७४, २७५, १२३ तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ चे कलम २६(२)(i), २६(२)(ii), २६(२)(iv), २७(३)(e), ३०(२)(a), आणि ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास: या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल (HC) बाबासाहेब घाडगे करत आहेत.
कारवाई करणारे पोलीस पथक:
सदरची धडक कारवाई सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पथकाने यशस्वी केली:
निर्भया पथक, करमाळा: पोहेकॉ. मंगेश पवार, पोकॉ. संभाजी पवार, पोकॉ. गणेश गुटाळ आणि मपोकॉ. विद्या इंगोले.
निर्भया पथक, बार्शी: पोहेकॉ. बाबासाहेब घाडगे, पोकॉ. हनुमंत पाडुळे आणि चालक पोकॉ. भाऊसाहेब महानोर.
या धडक कारवाईमुळे बार्शी व करमाळा परिसरातील अवैध गुटखा आणि तंबाखू विक्री करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले असून, नागरिकांमधून पोलीस प्रशासनाच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
Post Views: 12