सोलापूर – येथे सुरू असलेल्या ‘साऊथ सोलापूर आपटे ग्रुप चषक’ क्रिकेट स्पर्धेत एन.जी. क्रिकेट क्लब ‘रेड’ आणि ‘साऊथ सोलापूर ब्ल्यू’ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत प्रेक्षणीय विजय नोंदवले. या सामन्यांमध्ये फलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन करत शतकांची आतषबाजी केली.
पहिल्या सामन्यात एन.जी. क्रिकेट क्लब ‘रेड’ संघाने एन.जी. क्रिकेट क्लब ‘ब्ल्यू’ संघाचा २३० धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. सामन्यात ‘ब्ल्यू’ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, ‘रेड’ संघाच्या फलंदाजांनी आक्रमक खेळ करत धावांचा डोंगर उभारला. एन.जी. ‘रेड’ने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद ४१५ धावांची अवाढव्य धावसंख्या उभारली. यामध्ये रणबीर मुंब्रा (१०८ धावा) आणि हर्ष राऊत (१०२ धावा) यांनी शानदार शतकी खेळी केली. त्याला अभिजीत सरवदे (६५ धावा) आणि अनुज मुंदडा (५४ धावा) यांनी अर्धशतकी योगदान देऊन उत्तम साथ दिली. ‘ब्ल्यू’ संघाकडून गोलंदाजीत अनुज वाल्मिकी आणि श्रवण माळी यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
४१६ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना एन.जी. क्रिकेट क्लब ‘ब्ल्यू’चा संघ ६ बाद १८५ धावांपर्यंतच मजल मारू शकला. ‘ब्ल्यू’ कडून आर्यन हंगे याने ६५ धावांची झुंजार खेळी केली, तर श्लोक आनंदने २४ धावा केल्या. ‘रेड’ संघाकडून गोलंदाजी करताना अनिश बरोडीने २ आणि आदित्य चटकेने १ बळी मिळवला. शानदार शतकी खेळी करणाऱ्या रणबीर मुंब्रा याला ‘सामनावीर’ घोषित करण्यात आले.
दुसऱ्या अटीतटीच्या सामन्यात ‘साऊथ सोलापूर ब्ल्यू’ संघाने ‘हाय परफॉर्मन्स’ संघाचा २० धावांनी पराभव करत शानदार विजय मिळवला. साऊथ सोलापूर ब्ल्यूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जय गुंडच्या १०२ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर साऊथ सोलापूर ब्ल्यू संघाने सर्वबाद १९९ धावांचे आव्हान उभे केले. अनिश मुळे याने २४ धावांचे योगदान दिले. ‘हाय परफॉर्मन्स’ संघाकडून गोलंदाजी करताना पारस घाट याने ३, तर सार्थक रणशिंग याने २ बळी घेतले.
१९९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ‘हाय परफॉर्मन्स’ संघाचा डाव १७९ धावांवर संपुष्टात आला. त्यांच्याकडून संदेश गाडे याने ६७ धावांची अर्धशतकी खेळी केली, तर अभिषेक देशमुखने २४ धावा केल्या. साऊथ सोलापूर ब्ल्यूच्या अनिश मुळे याने भेदक गोलंदाजी करत ५ बळी घेतले आणि हाय परफॉर्मन्सच्या डावाला वेसण घातली. त्याला जय गुंडने २ बळी घेत उत्तम साथ दिली. १०२ धावांची शतकी खेळी आणि २ बळी घेणाऱ्या जय गुंड याला त्याच्या उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीसाठी ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आले.





















