सोलापूर – महाराष्ट्र राज्य वरिष्ठ महाविद्यालयीन शारीरिक शिक्षण संचालक महासंघ व महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल संघटना यांच्या वतीने राज्यातील अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांतील २०१७ नंतरच्या प्राध्यापक संवर्गातील ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक यांची १०० टक्के पदे भरती केली जावीत, या मागणीसाठी सोमवार, दि. ८ जून २०२६ पासून आझाद मैदान (मंत्रालय), मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महासंघाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही घोषणा करण्यात आली आहे.
शारीरिक शिक्षण संचालक आणि ग्रंथपाल ही महाविद्यालय स्तरावरील प्राचार्य पदाच्या खालोखाल अत्यंत महत्त्वाची पदे आहेत. या पदांना तासिका तत्वाचे (CHB) धोरणही मागील काही वर्षांत लागू करण्यात आले नव्हते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शारीरिक शिक्षण संचालक व ग्रंथपाल यांच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. शासनाने ११ फेब्रुवारी २०२६ रोजी ५०१२ सहाय्यक प्राध्यापकांच्या पदभरतीचा शासन निर्णय (GR) निर्गमित केला होता; मात्र या शासन निर्णयामध्ये सदर दोन्ही पदांचा समावेश करण्यात आला नसल्याने शारीरिक शिक्षण संचालक व ग्रंथपाल यांच्या पदरी पुन्हा निराशा पडली आहे.
सध्या महाविद्यालय स्तरावर शारीरिक शिक्षण संचालक व ग्रंथपाल या अत्यंत महत्त्वाच्या पदांवर आजही विनावेतन असंख्य पात्रता धारक काम करीत आहेत. २०१७ पासून अद्यापही वरिष्ठ महाविद्यालयांतील ही पदे रिक्त असल्याने महाविद्यालयांमधील क्रीडा विभाग आणि ग्रंथालय कामकाजात अनेक अडचणी येत आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP) लागू करण्यात आले असून युवा पिढीला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास शासन कटिबद्ध असल्याचे सातत्याने सांगितले जाते. मात्र, राज्यातील अनेक महाविद्यालयात ही पदे दीर्घकाळ रिक्त राहिल्याने शासनाचा मूळ उद्देश वास्तवात येण्यात अडथळे येत आहेत. याची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ पदभरती संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करावा, अशी मागणी महासंघाने केली आहे.
मुंबई येथे होणाऱ्या या बेमुदत धरणे आंदोलनासाठी महाराष्ट्रातील शारीरिक शिक्षण संचालक व ग्रंथपाल यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य वरिष्ठ महाविद्यालयीन शारीरिक शिक्षण संचालक महासंघाचे संस्थापक संदीप मनोरे, संघटनेचे अध्यक्ष डॉ. गणेश सिंहासने, राज्य सचिव प्रा. तात्याप्पा शेंडगे व सर्व जिल्हा पदाधिकारी यांनी केले आहे.






















