
सोलापूर – येथील निलेश गायकवाड ॲकॅडमीच्या वतीने पुष्प जिमखाना, डोणगाव येथे सुरू असलेल्या इंटर क्लब क्रिकेट स्पर्धेत सातव्या दिवशी लॉयन्स आणि किंग्स संघांनी आपापल्या सामन्यात विजय मिळवला.
किंग्स विरुद्ध लॉयन्स यांच्यातील सामन्यात लॉयन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ३० षटकात सर्वबाद १७२ धावा केल्या. यात रणवीर सिंग बोमरा याने (५१) अर्धशतक झळकावले. हर्ष राऊतने ३२, आशिष बाबरेने १९, सुजल गायकवाड आणि आर्यन भूमकर यांनी प्रत्येकी १३ धावा केल्या. किंग्सकडून श्रवण माळीने २६ धावांत ३, तर यशराज टेकाळेने ३१ धावांत २ बळी घेतले. कबीर कीर्तीकर व अभिजीत सरवदे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना किंग्स संघ २२.२ षटकात १४६ धावांवर सर्वबाद झाला. किंग्सकडून अभिजीत सरवदेने ३३, यश पवारने २३, आफन शेखने १८ आणि आदित्य गाडेने १४ धावा केल्या. लॉयन्सकडून गणेश पवारने ३५ धावांत ४, तर अनिष बिरोळीने ३६ धावांत ३ बळी घेत किंग्सचा डाव गुंडाळला. सुरज थोरात आणि आर्यन भुमकर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. हा सामना लॉयन्स संघाने २६ धावांनी जिंकला. गणेश पवार याला सामनावीर व उत्कृष्ट गोलंदाज, तर रणवीर सिंग बोमरा याला उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार देण्यात आला.
दुपारच्या सत्रात किंग्स विरुद्ध ईगल्स यांच्यातील सामन्यात किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २५ षटकात ८ बाद १६४ धावा केल्या. यात अभिजीत सरवदेने ३०, प्रवीण बेळणाकरने २३ आणि आदित्य गाडेने १८ धावा केल्या. ईगल्सकडून श्लोक आनंदने ७ धावांत २ बळी घेतले. गौरव गाडेकर, चेतन मंडेलो, आर्यन हंगे व अनुज वाल्मिकी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या ईगल्स संघाचा डाव २५ षटकात १६० धावांवर मर्यादित राहिला. त्यामुळे किंग्स संघाने ४ धावांनी विजय मिळवला. ईगल्सकडून श्रवण म्हेत्रेने नाबाद ४३, आर्यन हांगेने २० आणि सोहम कुलकर्णीने १७ धावा केल्या. किंग्सकडून विराज पांढरेने २८ धावांत ३, श्रवण माळीने १९ धावांत २ आणि यश पवारने ३१ धावांत २ बळी घेतले. यश पवार याला सामनावीर व उत्कृष्ट गोलंदाज, तर श्रवण म्हेत्रे याला उत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरवण्यात आले.
या सामन्यांसाठी पंच म्हणून प्रवीण कुलकर्णी व साकिब सय्यद यांनी काम पाहिले. गुणलेखन व समालोचन वीरभद्र कोळी यांनी केले.
——
























