सोलापूर : शहर व जिल्ह्याच्या रखडलेल्या विकासकामांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर विकास मंचाच्या वतीने १२ जून रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत जिल्हा परिषद समोर एक दिवसीय आंदोलन करण्यात येणार आहे.
सोलापूरच्या विकासासाठी अत्यावश्यक असलेल्या अनेक प्रकल्पांकडे शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मंचाने केला आहे. विमानसेवा, आयटी पार्क, शहर परिवहन सेवा, पाणीपुरवठा आणि शैक्षणिक सुविधांबाबत ठोस निर्णय घेण्याची मागणी आंदोलनातून करण्यात येणार आहे. सोलापूर–गोवा व सोलापूर–हैदराबाद विमानसेवा कायम ठेवण्याबरोबरच विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी. सोलापूरमध्ये आयटी पार्क तातडीने सुरू करून रोजगारनिर्मितीला चालना द्यावी.
धर्मवीर संभाजी महाराज तलाव आणि पत्रकार भवन परिसरातील रेल्वे पुलांचे रुंदीकरण, विजापूर रोडवर सर्व्हिस रोडची उभारणी, महापालिकेची परिवहन बस सेवा पुन्हा सुरू करणे आणि शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था सुधारून नागरिकांना दररोज पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे. याशिवाय सोलापूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात येणार आहे. सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आता केवळ आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कृतीची गरज असल्याचे मंचाने नमूद केले आहे.
विविध सामाजिक संस्था, व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी, महिला आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंचाने केले आहे.
Post Views: 11