बार्शी – शहर पोलिसांनी गुटखा व तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठा व विक्रीविरोधात कारवाई करत बारंगुळे प्लॉट परिसरातून ९ हजार ३७६ रुपयांचा गुटखा सदृश्य प्रतिबंधित साठा जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून पुरवठादाराचा शोध सुरु आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुरुवार दि. ११ रोजी सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास बारंगुळे प्लॉट येथील शाहिद शब्बीर शेख (वय ३१) यांच्या राहत्या घरी छापा टाकला.
छाप्यादरम्यान घरातील स्टोअर रुममध्ये विविध प्रकारचा गुटखा, पानमसाला व जर्दा स्वरुपातील प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा आढळून आला. दोन पंचांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या पंचनाम्यात खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये राजनिवास सुगंधित पान मसाला, के.आर. गुटखा, झेडएल-०१ जाफराणी जर्दा, गोवा गुटखा असा एकूण ९,३७६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित अन्नपदार्थांमधून नमुने विश्लेषणासाठी वेगळे करण्यात आले असून उर्वरित साठा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. चौकशीदरम्यान शाहीद शेख याने हा माल पुरवठादार ‘बाबू’ नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केल्याचे सांगितले आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू व तत्सम अन्नपदार्थांचा विक्रीसाठी साठा केल्याप्रकरणी आरोपी शाहीद शब्बीर शेख तसेच पुरवठादार बाबू (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील संबंधित कलमांसह भारतीय न्याय संहिता कलम २२३, २७४, २७५, १२३ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास बार्शी शहर पोलीस करीत आहेत.