सोलापूर : अदिला नदी (नाला) परिसरातील रेड व ब्ल्यू लाइनमुळे निर्माण झालेल्या नागरिकांच्या अडचणींची दखल घेत महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. आचारसंहितेनंतर हा विषय विधिमंडळात मांडून मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
अदिला नाल्यालगतच्या वसंत विहार, गायत्रीनगर, व्यंकटेश्वर सिटी, स्वराज्य विहार, गोकुळ विहार, समर्थ रेसिडेन्सी आणि वैष्णवी हाइट्स परिसरातील नागरिकांना रेड व ब्ल्यू लाइनमुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. बांधकाम परवानग्या, मालमत्ता व्यवहार तसेच विकासकामांवर त्याचा परिणाम होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत सुमारे हजार ते बाराशे एकर क्षेत्रावर परिणाम करणाऱ्या या प्रश्नाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नाल्याचे गाळ काढणे, खोलीकरण व रुंदीकरण झाल्यानंतर संबंधित विभागांकडून पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तसेच अदिला नाल्याचे रेखांकन आणि व्याप्ती यासंदर्भातही महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी या प्रश्नाबाबत निवेदन सादर करून नागरिकांच्या अडचणींकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी ही पाहणी आयोजित करण्यात आली.
स्थळ पाहणीनंतर नागरिक, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करताना अण्णासाहेब बनसोडे म्हणाले, अदिला नाला परिसरातील नागरिकांच्या समस्या गांभीर्याने घेतल्या जातील. प्रत्यक्ष पाहणीचा अहवाल आणि संबंधित माहितीच्या आधारे हा विषय विधिमंडळात मांडून योग्य तो निर्णय होण्यासाठी प्रयत्न केले जातील.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रेड-ब्ल्यू लाइनच्या प्रश्नावर सकारात्मक निर्णय होऊन नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा परिसरातील रहिवाशांनी व्यक्त केली. पाहणी दौऱ्यानंतर अदिला नाला संघर्ष समितीच्या वतीने अण्णासाहेब बनसोडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी आनंद चंदनशिवे, दशरथ कसबे, गणेश पुजारी, गौतम कसबे, योगी काटकर, तुकाराम गायकवाड यांच्यासह संघर्ष समितीचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 30