सोलापूर : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज (खनिकर्म) शाखेचे बनावट धनादेश तयार करून शासनाची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान याप्रकरणी दोघाजणांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निखिल कुमार आणि सव्वीक चॅटर्जी (दोघांचा पूर्ण पत्ता माहीत नाही) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी अमरनाथ स्वामीनाथ भिंगे (वय ४२, रा. गुलमोहर सोसायटी, वसंत विहार) यांनी फिर्याद दिली आहे. यात आरोपीने दिलेला ३ लाख ९२ हजारांचा पहिला चेक वटला दुसरा ८ लाख ५५ हजारांचा चेक दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आला.
मंगळवार ९ जून रोजी जिल्हा खनिकर्म अधिकारी नीलिमा जाधव यांच्या मोबाईलवर स्टेट बँक ऑफ इंडियातील कर्मचाऱ्याने फोन करून तुमच्या कार्यालयाचा ८ लाख ५५ हजारांचा आरोपी सव्वीक चॅटर्जी यांना वटवून द्यायचा आहे का? अशी विचारणा केली. यावर खनिकर्म अधिकारी जाधव यांनी असा कोणताही धनादेश कोणालाही दिला नसल्याचे स्पष्ट केले.
त्यानंतर कार्यालयाच्या ई-मेल आयडीची तपासणी केली असता, बँकेच्या अधिकृत मेल आयडीसारख्या दिसणाऱ्या संशयास्पद आयडीवरून मेल आलेले दिसले. फिर्यादी अमरनाथ भिंगे आणि जिल्हा खनिकर्म अधिकारी नीलिमा जाधव यांनी तातडीने ट्रेझरी शाखेत जाऊन चौकशी केली. तेव्हा आरोपी निखिल कुमार याने खनिकर्म कार्यालयाचा हुबेहूब बनावट धनादेश तयार करून पटना, बिहार येथून ३ लाख ९२ हजाराची रक्कम आधीच काढून घेतली होती. तर दुसरा आरोपी सव्वीक चॅटर्जी याने ८ लाख ५५ हजाराचा दुसरा बनावट धनादेश वटवण्याचा प्रयत्न केला, मात्र बँकेच्या सतर्कतेमुळे आणि खनिकर्म अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे हा प्रयत्न फसला. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव हे गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.