बार्शी – तालुक्यातील उपळाई (ठों) येथे वैद्यकीय परवाना व शैक्षणिक पात्रता नसतानाही उपचार करणाऱ्या कथित बोगस डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मृताच्या मुलाने बार्शी तालुका पोलीस ठाण्यात बोगस डॉक्टर शंकर पाठक याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी गोविंद तानाजी सुतार (वय २८, रा. विश्वासनगर, उपळाई ठों.) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन, त्यांचे वडील तानाजी नरहरी सुतार (वय ६०) यांना शेतातील कामामुळे कंबरेत वेदना होत असल्याने २६ एप्रिल २०२६ रोजी रात्री गावातील शंकर मनोहर पाठक यांच्याकडे उपचारासाठी नेण्यात आले होते.
तक्रारीनुसार, संबंधिताने कंबरेत इंजेक्शन देऊन औषधे दिली. मात्र दुसऱ्या दिवशी इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी गाठ निर्माण झाली. सुरुवातीला बर्फाने शेकण्याचा सल्ला देण्यात आला, परंतु गाठ कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत गेली.
त्यानंतर २ मे रोजी तानाजी सुतार यांना बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तपासणी दरम्यान गाठ गंभीर स्वरुपाची असल्याचे डॉक्टरांनी सांगत शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. मात्र उपचार सुरु असतानाच ४ मे रोजी त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठी संबंधित वैद्यकीय कागदपत्रे व शवविच्छेदन अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. परंतु अहवाल मिळण्यास विलंब होत असल्याने फिर्यादी गोविंद सुतार यांनी आरोप केला आहे की, संबंधित शंकर पाठक यांच्याकडे कोणतीही मान्यता प्राप्त वैद्यकीय पदवी, प्रशिक्षण किंवा उपचाराचा परवाना नसतानाही ते अनेक वर्षांपासून गावात रुग्णांवर उपचार करीत आहेत. त्यांनी दिलेल्या इंजेक्शनमुळेच वडिलांच्या शरीरात गंभीर संसर्ग होऊन गाठ निर्माण झाली आणि त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला व माझ्या वडिलांच्या मृत्यू शंकर पाठक जबाबदार असल्याचे आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच वैद्यकीय ज्ञान व अधिकृत परवानगी नसताना उपचार करुन वडिलांच्या जीवाशी खेळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत असून वैद्यकीय अभिप्राय व तपास अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Post Views: 16