मंगळवेढा : पाठखळ येथील मे. प्रहार उद्योग समूह व कृषी केंद्राच्या दुकान आणि गोदामावर कृषी विभागाने टाकलेल्या छाप्यात खत म्हणून मिठाची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी १० लाख ४६ हजार ७८० रुपयांच्या भेसळयुक्त रासायनिक खतांचा साठा व विक्री केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतीश मनोहर भोसले (रा. पाठखळ) व रविराज शंकर कणसे (रा. सातारा) यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर जिल्हा कृषी अधिकारी आणि मंगळवेढा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठखळ येथील मे. प्रहार उद्योग समूह व कृषी केंद्राच्या दुकान आणि गोदामावर छापा टाकला होता.
या कारवाईदरम्यान खत म्हणून मिठाची. विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. तसेच भेसळयुक्त रासायनिक खतांचा साठा करून त्याची विक्री केल्याचेही तपासात
खत म्हणून मिठाची विक्री
आढळून आले. संबंधितांकडे खत विक्रीसंदर्भातील बिले व आवश्यक कागदपत्रांची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यांना संबंधित बिले सादर करता आली नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
हरिदास बोंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, आरोपींनी ८ जून रोजी सायंकाळी सातपूर्वी बेकायदेशीररीत्या भेसळयुक्त रासायनिक खतांचा साठा करून त्याची विक्री केली. तसेच १० लाख ४६ हजार ७८० रुपयांच्या भेसळयुक्त खतांची निर्मिती व विक्री करून शासन आणि शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे करीत आहेत.
Post Views: 30