सोलापूर – दक्षिणमधील नागरीकांनी विविध ग्रामपंचायत व ग्रामसेवकांच्या मनमानी कारभाराबद्दल दक्षिण सोलापूर पंचायत समितीकडे तक्रार केल्यानंतर गटविकास अधिकारी मनोज राऊत त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा सुरू आहे. पंचायत समिती कार्यालयाकडे मंद्रुपमधील सरपंच व ग्रामसेवकांच्या भ्रष्ट कारभाराबद्दल तक्रार करून दीड वर्ष होत आले. त्या अर्जाची दखल न घेता ‘राजकीय दबावाखाली’ कोट्यावधी रूपयांची बिले काढण्याचा खटाटोप सुरू आहे. याबाबत वारंवार गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्याकडे विचारणा केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे गटविकास अधिकार्यांच्या मनमानी कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मंद्रूपमध्ये तीन वर्षात चार ते पाच कोटीचे विकासकामे करण्यात आली. तरीही गावात प्राथमिक सोईसुविधांचा अभाव आहे. केवळ कागदावर विकासकामे दाखवून बिल उचलल्याने दक्षिणच्या बीडीओंकडे तक्रार केल्यानंतरही त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे.
माझी वसुंधरा योजनेतून मंद्रूप ग्रामपंचायतीला दोन कोटी ७५ लाख रूपयांचे बक्षिस मिळाले. मात्र या पुरस्कार रक्कमेचा योग्य वापर न झाल्याने निधी वाया गेल्याची चर्चा सुरू आहे. सौरऊर्जा, फायबर शौचालय , कचरीकुंडी , प्लास्टीक खुर्च्या सायकल व भांडी वाटपामध्ये घोटाळा झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. मात्र अद्याप त्याची चौकशीही करण्यात आली नाही.
माझी वसुंधरा पुरस्कार योजनेतून गतवर्षी लावलेल्या चार हजार झाडांची पाहणी न करताच केवळ हिरवीगार झाडांचे ‘फोटोसेशन’ करून बिल काढण्यात येत आहे. यातील निम्याहून अधिक झाडे पाण्याअभावी करपून गेली आहेत. तीस ते चाळीस टक्के झाडे पाहून जवळपास दीड कोटी रूपये बिल काढण्यासाठी सत्ताधार्यांचा खटाटोप सुरू आहे. मात्र कागदावरील झाडे जमिनीवर प्रत्यक्षात नसल्यामुळे वृक्षारोपणामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे . पर्यावरण संवर्धन सारख्या संवेदनशील बाबीकडे बीडीओ दुर्लक्ष करून मंद्रूपच्या सत्ताधार्यांचे बोगस बिल काढण्यास सहकार्य करीत असल्याने पर्यावरणप्रेमीं मधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मंद्रूप जिल्हा परिषद सदस्या सोनाली कडते व पंचायत समिती सदस्य मळसिध्द मुगळे यांनी झाडांची पाहणी करून व जिल्हास्तरीय समितिकडून चौकशी करून टप्याटप्याने बिल देण्यास सांगितला आहे. मात्र बीडीओ ‘वरिष्ठांचे’ आदेश असल्याचे सांगून बिल काढण्यावर ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे.
….
चौकट
….
झाडांच्या संख्येनुसार बिल द्यावे
…
मंद्रूपमध्ये माझी वसुंधरा योजनेच्या बक्षिस निधीत घोटाळा झाला आहे. वृक्षारोपणासारख्या संवेदनशील विषयातही झाडांची संख्या वाढवून बिल काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. दक्षिणच्या बीडीओंनी जिल्हास्तरीय समितिकडून झाडांची संख्या पाहून टप्याटप्याने बिल काढावे. अन्यथा त्यांच्या कार्यालयासमोर ठिया आंदोलन करणार आहे.
मळसिध्द मुगळे, पंचायत समिती सदस्य , मंद्रूप
….
दक्षिणच्या बीडीओंची मनमानी चालणार नाही
…
नागरीक व लोकप्रतिनिधींच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून दक्षिणचे बीडीओ मनमानी कामकाज करीत आहेत. मंद्रूप ग्रामपंचायत विकासकामातील भ्रष्टाचाराबाबत तक्रारी असतानाही बीडीओ बिल काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. नियमानुसार व कायदेशीर कामांचे बिल काढावे. मात्र घोटाळा व तक्रार असलेल्या कामांची बिले काढल्यास बीडीओविरोधात वरिष्ठांकडे तक्रार करणार आहे.
सोनाली कडते, जिल्हा परिषद सदस्या , मंद्रूप
..
बीडीओकडून प्रतिसाद नाही
….
मंद्रूपमधील माझी वसुंधरा योजनेतील झाडांच्या बिलासंदर्भात विचारणा करण्यासाठी दक्षिणचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्याशी संपर्क साधला. मात्र प्रतिसाद मिळाले नाही.


















