अक्कलकोट : शेतजमीन खरेदी- विक्रीच्या व्यवहारात बागायती जमीन असल्याचे भासवून प्रत्यक्षात जिरायती
जमिनीचा करार करून तब्बल २४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याने अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ही घटना २९ ऑक्टोबर २०२५ ते १० जून २०२६ या कालावधीत घडली आहे. या घटनेत आरोपी सोपान हरिदास
सावंत, हरिदास बळीराम सावंत, ज्ञानेश्वर हरिदास सावंत आणि कविता हरिदास सावंत (सर्व रा.चुंगी,ता.अक्कलकोट)
यांच्याविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत प्रमिला रामनिंग सोनटक्के (वय ४७, रा. चुंगी, ता. अक्कलकोट) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑक्टोबर २०२५ ते १० जून २०२६ या कालावधीत चुंगी (ता. अक्कलकोट) येथे आरोपींनी शांतकुमार रामचंद्र सुतार यांच्याशी शेतजमीन खरेदी-विक्रीबाबत बोलणी करून संबंधित जमीन बागायती
असल्याचे सांगितले. मात्र, कागदोपत्री व्यवहार करताना जिरायती शेतजमिनीचा करार करून दिला. आरोपींनी त्यांच्याकडून २४ लाख रुपये स्वीकारले.त्यानंतर जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण करून देण्याबाबत आरोपींनी वारंवार टाळाटाळ केली. तसेच वेगवेगळी कारणे देत फिर्यादीची दिशाभूल केली.पैसे परत मागितल्यावर आरोपींनी शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. १२ जून २०२६ रोजी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ आर. आर. कोली करीत आहेत.
Post Views: 11