आज अनेक गावांमध्ये व शहरातील गल्लीबोळात अवैध सावकारी, गुटखा-मावा विक्री, हातभट्टी दारू, मटका, जुगार, वेश्या व्यवसाय तसेच मुरूम, वाळू, माती यांसारख्या गौण खनिजांची अवैध उत्खनन व वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असतात. अशा व्यवसायांमुळे सामाजिक वातावरण बिघडते, गुन्हेगारीला खतपाणी मिळते आणि अनेक कुटुंबांचे आर्थिक व सामाजिक नुकसान होते.
विशेष म्हणजे डायल 112 वर माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख गोपनीय ठेवली जाते. माहिती देणाऱ्याचे नाव किंवा तपशील संबंधित अवैध व्यवसायिक अथवा स्थानिक पातळीवरील कोणालाही सांगितले जात नाहीत. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता या सुविधेचा वापर करावा.
गावातील एखाद्या चौकात जुगार सुरू असेल, एखाद्या घरातून अवैध दारू विक्री होत असेल, मटका किंवा गुटख्याचा काळाबाजार सुरू असेल किंवा नदीपात्रातून रात्रीच्या अंधारात वाळू उपसा होत असेल, तर त्याविरोधात केवळ चर्चा करून उपयोग नाही. त्यासाठी अधिकृत यंत्रणेकडे तक्रार पोहोचणे आवश्यक आहे. ‘डायल 112’ हे त्यासाठीचे प्रभावी आणि तत्काळ साधन ठरू शकते.
लोकशाहीत नागरिक हा सर्वात मोठा प्रहार असतो. प्रशासनाच्या नजरेतून सुटणाऱ्या अनेक गोष्टी स्थानिक नागरिकांच्या नजरेतून सुटत नाहीत. त्यामुळे समाजहितासाठी आणि पुढील पिढीला सुरक्षित व समाजात शांतता राखन्यासाठी प्रतेकाची जबाबदारी समजून प्रत्येक जबाबदार नागरिकाने अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवणे ही काळाची गरज आहे.
आज भाळवणी ग्रामस्थांनी दाखवलेला मार्ग उद्या संपूर्ण मंगळवेढा तालुक्यासाठी आदर्श ठरू शकतो. अवैध धंद्यांना पाठबळ देण्यापेक्षा त्यांची माहिती ‘112’ वर देऊन कायद्याला मदत करणे हेच खरे नागरिकत्व आहे.
“अवैध धंद्यांची माहिती लपवू नका… थेट डायल 112 वर कळवा; गाव वाचवा, समाज वाचवा!”सुज्ञ नागरीकांना अहवान आहे.


















