
सोलापूर – संतांच्या समागमामुळे माणसाला योग्य विचार आणि सन्मार्गाची प्राप्ती होते.संतांच्या संगतीत आल्यावर परमात्म्याच्या प्राप्तीपर्यंत जाता येते.संतांच्या संगतीत उद्धार आणि मोकारांच्या संगतीत पतन होते असे सांगतानाच दुर्जनाचं साधं दर्शन जरी झालं ,तरी ते आपल्या जीवनात घातक आहे ,असे विचार देहू येथील श्री.गाथा मंदिराचे अध्यक्ष ह.भ.प.पांडुरंग महाराज घुले यांनी व्यक्त केले. दमाणी नगरातील गड दर्शन समाज मंदिरात ह.भ.प.माऊली महाराज बचुटे – सवाळकर शिष्य – मित्र परिवाराच्यावतीने किर्तन महोत्सव सुरु आहे.शनिवारी रात्री झालेल्या किर्तनात पांडुरंग महाराज घुले यांनी संतांच्या सहवासामुळे आपल्याला जीवनाचे खरे उद्दिष्ट समजते ,आणि भगवंताच्या बाबतीत नितांत श्रद्धा व गोडी निर्माण होते .नामस्मरण कधीही सुटू देऊ नका ,मुखाने विठ्ठलाचा जयघोष आणि गजर करत रहा ,जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले.
संतांच्या संगतीत आपलं जीवन भले होतं, असे संत तुकाराम महाराज सांगतात .चांगले आचार आणि विचार घडण्यासाठी संतांची संगत आवश्यक आहे. संतांच समागमन घडले पाहिजे.
तुकाराम महाराज म्हणतात संतांचे समागमन घडले तर ते उपयोगालाच येणार आहेत. योग्य सतपुरुषाच्या संगतीत आले पाहिजे. संताच्या संगतीत आल्यावर अयोग्य व्यक्तीसुद्धा योग्य पद्धतीने आचरणात येतो ही ताकद संतांमध्ये आहे. सर्व सुखं संतांच्या संगतीत प्राप्त होतील. जशी संगत करतो तसे विचार आपल्या जीवनात निर्माण होतात. जसे विचार तसे आचरण होते. वाईटाच्या संगतीत वाईटच विचार होणार. संतांच्या संगतीत चांगले आचार आणि विचार होतात.संगत ही आपल्या जीवनात वेगवेगळे स्तर निर्माण करणार आहे. संत ,दर्शनातून आणि शब्दातून कृपा करतात. संत ,योग्य दिशा देत असतात.वाल्या हातात कुऱ्हाड घेऊन लुटण्यासाठी आला होता.नारदाच्या समागमात आल्यावर मन परिवर्तन झाले.तुकोबारांयांच्या अभंगाने दगडालासुद्धा तारले.अभंग तरले म्हणून आपण तरलो आहोत असे सांगतानाच व्यसन सोडा, शाकाहारी बना , मुलांना भजन,किर्तन , वारकरी व आध्यत्मिक शिक्षण देणे काळाची गरज बनलीअसल्याचे पांडुरंग महाराज घुले यांनी यावेळी बोलताना सांगितले.
पांडुरंग महाराज घुले,म्हणाले संत संगतीमुळे जीवनातील अज्ञान दूर होते आणि मनाला शांती लाभते .संसारात राहून सुद्धा भगवंताच्या चरणी लीन होणे आणि इतरांच्या कल्याणासाठी झटणे हाच खरा धर्म आहे.संत समागमामुळे विचार शुद्ध होतात, जीवनाला योग्य दिशा मिळते आणि राम नामाची गोडी लागते. संत नेहमीच चांगल्या संगतीची शिकवण देतात .संतांच्या सहवासात आल्यावर माणसाचे विचार बदलतात. भगवंताचे नाम मुखात असणे आणि संतांच्या विचारावर श्रद्धा ठेवणे याच विचाराने जीवन आनंदी आणि परिपूर्ण बनते. भगवंताच्या नामाशिवाय मानवी मन अशांत असते .नाम चिंतनाने अंत;करणातील सर्व दोष निघून जातात.भगवंताचे नामस्मरण करत असताना आपल्यातून कोणत्याही प्रकारची वाईट कृती घडणार नाही ,याची काळजी आपण घेतली पाहिजे. प्रत्येकाने आपल्या वाट्याला आलेले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे आणि भगवंताच्या चरणी आपली भक्ती अर्पण करावे .संतांची संगती धरावी ,संतांचे विचार हे कल्पवृक्षासारखे असतात ,ते आपल्याला मायेच्या अंधारातून बाहेर काढून परमार्थाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात .त्यामुळे एकमेकांना समजून घेणे आणि प्रेमभाव टिकवून ठेवणे हीच खरी भक्ती आहे संत संगतीमुळे जीवनातील अज्ञान दूर होते आणि मनाला शांती लाभते , असेही घुले महाराज म्हणाले.