सांगोला – पोलीस ठाण्याच्या पथकाने जवळा (ता.सांगोला) येथील पांढरे वस्ती परिसरातील कोरडा नदीपात्रातून बेकायदेशीररित्या वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली असून तब्बल १ कोटी २१ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, शनिवार दि.१३ जून रोजी रात्री सांगोला पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत प्राप्त माहितीनुसार जवळा येथील पांढरे वस्ती परिसरातील कोरडा नदीपात्रामध्ये पहाटे सव्वा दोनच्या दरम्यान पोलीस पथक पोहोचले असता कोरडा नदीपात्रामध्ये यंत्रसामग्रीचा आवाज येत असल्याचे निदर्शनास आले. पथकाने सावधगिरीने परिसरात प्रवेश करून पाहणी केली असता तीन जेसीबीच्या सहाय्याने नदीपात्रातून वाळूचा उपसा करून दोन ट्रॅक्टर-ट्रॉली व एका टिपरमध्ये वाळू भरली जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून संबंधित वाहन चालकांना ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान वाहन चालकांकडे वाळू उपसा अथवा वाहतुकीसाठी आवश्यक असलेले कोणतेही वैध परवाने, रॉयल्टी पास अथवा शासनाची परवानगी नसल्याचे निष्पन्न झाले.
या कारवाईमध्ये निखील महादेव नायकुडे (वय-२५), रा.भोपसेवाडी, ता.सांगोला, रामचंद्र अर्जुन आगलावे (वय-४२), स्वप्निल दत्तात्रय तोडकर (वय-२५), दोघे रा.आगलावेवाडी, ता.सांगोला, रोहन महादेव देवकते (वय-२५), रा.वाकी घेरडी, ता.सांगोला, शेखर युवराज लवटे (वय-२१), रा.आलेगाव, ता.सांगोला, तसेच अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झालेला समाधान महादेव हजारे, रा.पांढरे वस्ती,जवळा, ता.सांगोला यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे, मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखालील सांगोला पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचे आदेशान्वंये पोउपनि.गुरव, पोउपनि.सागर पाटील, पोहेकॉ.अस्लम काझी, पोहेकॉ.नवनाथ सावंत, पोकॉ.सद्दाम नदाफ, पोकॉ.मच्छिद्र माळी, पोकॉ.मारुती पांढरे, पोकॉ.सोमनाथ भुई यांनी केली. पुढील तपास पोहेकॉ.राजगे हे करीत आहेत.
चौकट-
सदर कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
जेसीबी क्र.एमएच.१२.इबी.१०८३, जेसीबी क्र.एमएच.१०.बीजी.९१९२, विना नंबर १ असे ३ जेसीबी, विना नंबर ट्रॅक्टर-ट्रॉली २ व विना नंबर टिपर १ तसेच ६ ब्रास वाळु असा एकूण १ कोटी २१ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Post Views: 35