सोलापूर – महाराष्ट्रातील शिवसेनेच्या काही खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत स्वतंत्र भूमिका स्वीकारल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये व शिवसैनिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी याघडामोडींवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत भाजप आणि शिंदे गटावर लोकशाहीची गळचेपी, विरोधकांना संपविण्याचे राजकारण आणि सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख डॉ. प्रा. अजय दासरी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, “शिवसेना ही निष्ठा, त्याग आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर उभी असलेली संघटना आहे. पक्षाच्या चिन्हावर, पक्षाच्या तिकिटावर आणि शिवसैनिकांच्या अथक परिश्रमावर निवडून आलेल्या काही खासदारांनी पक्षाशी द्रोहाचा मार्ग स्वीकारला असेल, तर तो केवळ पक्षाशी नव्हे तर त्यांना निवडून देणाऱ्या मतदारांशी आणि शिवसैनिकांशी केलेला विश्वासघात आहे.”
त्यांनी पुढे म्हटले की, “नैतिकतेची जाणीव असेल तर अशा खासदारांनी प्रथम खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि त्यानंतरच दुसऱ्या राजकीय वाटेवर जावे. शिवसेनेच्या नावावर मते मिळवून नंतर वैयक्तिक स्वार्थासाठी पक्षांतर करणे ही जनतेची फसवणूक आहे. महाराष्ट्रातील जागरूक मतदार आणि निष्ठावंत शिवसैनिक हा प्रकार कधीही विसरणार नाहीत.”
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरणराज केंगनाळकर यांनीही भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. “देशात लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू असून साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर करून विरोधी पक्षांतील लोकप्रतिनिधींना फोडण्याचे काम केले जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव, निधी रोखणे, सत्तेचा प्रभाव आणि विविध प्रलोभने दाखवून विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न होत आहे,” असा आरोप त्यांनी केला.
केंगनाळकर म्हणाले, “लोकशाहीत मतदारांचा कौल सर्वोच्च असतो. मात्र निवडणुकीत एका पक्षाच्या विचारांवर निवडून आलेल्या प्रतिनिधींनी नंतर वेगळी भूमिका घेणे हे मतदारांच्या विश्वासाला तडा देणारे आहे. जनतेत निर्माण होत असलेली नाराजी भविष्यात मोठ्या राजकीय उद्रेकाचे रूप धारण करू शकते.”
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले की, यापूर्वीही काही आमदारांनी पक्ष सोडला होता, मात्र शिवसेना अधिक बळकटपणे उभी राहिली. “काही व्यक्ती पक्ष सोडून जाऊ शकतात, पण विचारधारा, जनाधार आणि लाखो शिवसैनिकांची निष्ठा कुणीही घेऊन जाऊ शकत नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संघटनबांधणी अधिक जोमाने केली जाईल आणि या विश्वासघाताचा हिशोब जनतेच्या न्यायालयात मागितला जाईल,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्त्यांमध्ये संताप आणि संघटनात्मक हालचालींना वेग आल्याचे चित्र दिसून येत आहे.
Post Views: 14