
सोलापूर – आयुर्वेदिक उपचार पद्धतीला अधिक बळकटी देण्याबरोबरच औषधी वनस्पतींचे संवर्धन, संशोधन आणि जनजागृती यासाठी आयुर्वेदिक दवाखान्यांमधील औषधी वनस्पती उद्यानांची भूमिका दिवसेंदिवस महत्त्वाची ठरत आहे. ‘हर्बल गार्डन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उद्यानांमुळे आयुर्वेदाचा प्रत्यक्ष अनुभव नागरिकांना मिळत असून ते आरोग्य शिक्षणाचे प्रभावी माध्यम बनत आहेत. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, करमाळा आणि बार्शी तालुक्यातील आरोग्य केंद्रात औषधी वनस्पती उद्यान प्रभावशाली ठरत आहे.
औषधी वनस्पती उद्यानामध्ये विविध औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींची लागवड केली जाते. त्यामुळे आयुर्वेदिक औषधनिर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या ताज्या आणि शुद्ध वनस्पती सहज उपलब्ध होतात. यामुळे औषधांची गुणवत्ता आणि परिणामकारकता वाढण्यास मदत होते. तसेच दुर्मिळ आणि लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या अनेक औषधी वनस्पतींचे संवर्धनही या माध्यमातून शक्य होत आहे.
या उद्यानांचा सर्वाधिक फायदा विद्यार्थी, वैद्यकीय अधिकारी आणि संशोधकांना होत आहे. विविध वनस्पतींची प्रत्यक्ष ओळख, त्यांचे औषधी गुणधर्म आणि उपयोग समजून घेण्यासाठी हे उद्यान ‘जिवंत प्रयोगशाळा’ म्हणून कार्य करते. औषधी वनस्पतींच्या लागवड पद्धती, उपयोग आणि संशोधनासाठीही ही उद्याने उपयुक्त ठरत आहेत.
रुग्णांमध्ये आयुर्वेदाविषयी विश्वास निर्माण करण्यामध्येही या उद्यानांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वनस्पती प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाल्याने नागरिकांमध्ये नैसर्गिक आणि पारंपरिक उपचार पद्धतींबाबत जागरूकता वाढत आहे. त्याचबरोबर परिसरात हिरवळ वाढल्याने पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि स्वच्छ वातावरण निर्मितीलाही हातभार लागत आहे.
कोट
औषधी वनस्पती उद्यान व्हावे काळाची गरज
आरोग्य सेवा, शिक्षण, संशोधन आणि पर्यावरण संरक्षण या चारही घटकांना एकत्र जोडणारे औषधी वनस्पती उद्यान हे आयुर्वेदिक दवाखान्यांचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य ठरत असून भविष्यात अशा उद्यानांचा विस्तार होणे काळाची गरज असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतिश कोपूरवाड यांनी सांगितले.
Post Views: 31