सोलापूर – आषाढी वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासनासमोर असणारी मोठी जबाबदारी आहे. पांडुरंगाने दिलेल्या या सेवेच्या संधीचे रूपांतर प्रभावी व्यवस्थापनात करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला असून, यंदाच्या आषाढी वारीसाठी वाढती गर्दी लक्षात घेऊन सर्वंकष आणि हायटेक नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिली.
जिल्हा परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक अमोल जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कुशल जैन म्हणाले की, यावर्षी अधिक मासामुळे अनेक भाविकांनी पंढरपूरात दर्शन घेतले असले तरी मानाच्या संतांच्या पालख्यांबरोबर पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. त्यामुळे यंदाही गतवर्षीपेक्षा अधिक सक्षम नियोजन करण्यात आले आहे. पावसाळा उशिरा सुरू होण्याची शक्यता, वाढणारी गर्दी आणि वारकऱ्यांच्या सोयी-सुविधा या सर्व बाबींचा विचार करून सूक्ष्म पातळीवर म्हणजेच मायक्रो प्लॅनिंग करण्यात आले आहे.
चौकट
स्वच्छता व्यवस्थेला प्राधान्य
वारी मार्गावरील स्वच्छता व्यवस्थेला यंदा विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. मानाच्या पालख्यांसोबत येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन स्वच्छतागृहांची संख्या ३० टक्क्यांनी वाढविण्यात आली आहे. याशिवाय स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई, कचरा संकलन, निर्जंतुकीकरण आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत राहणार आहे.
चौकट
आरोग्य विभाग सज्ज
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी सांगितले की, वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध ठिकाणी वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, औषधसाठा आणि आपत्कालीन उपचार सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. उष्माघात, पावसाळी आजार, संसर्गजन्य रोग आणि अन्य आरोग्यविषयक समस्यांवर तातडीने उपचार मिळावेत यासाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज आहे.
चौकट
जर्मन हँगर व मसाज सेंटरची सुविधा
वारकऱ्यांना विश्रांती मिळावी यासाठी निवडक ठिकाणी जर्मन हँगर उभारण्यात येणार आहेत. तसेच लांब पल्ल्याचा पायी प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांच्या शारीरिक थकवा दूर करण्यासाठी मसाज सेंटरची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांना अधिक आरामदायी वातावरण मिळणार आहे.
चौकट
विभागनिहाय समन्वयावर भर
वारीचे यशस्वी व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामपंचायत, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, विद्युत, महसूल आणि पोलीस प्रशासन यांच्यात प्रभावी समन्वय ठेवण्यात आला आहे. प्रत्येक विभागाला स्वतंत्र जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून, संभाव्य अडचणींवर त्वरित उपाययोजना करण्यासाठी नियंत्रण कक्षही कार्यरत राहणार आहे.
चौकट
वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन कटिबद्ध
आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. लाखो वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित, स्वच्छ आणि सुखकर व्हावा यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून, सर्व विभागांनी समन्वयाने काम करून यंदाची वारी अधिक यशस्वी करण्याचा संकल्प केला असल्याचे सीईओ कुशल जैन यांनी सांगितले.
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...