मोडनिंब – परिसरातील प्रलंबित वीजप्रश्नांबाबत महावितरण कंपनीने सकारात्मक भूमिका घेतल्याने २० जून रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर प्रस्तावित रस्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हा परिषद सदस्या तथा जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती व शिक्षण समिती सदस्या वंदना शिवाजी कांबळे यांनी महावितरण प्रशासनाकडे निवेदन देऊन पाठपुरावा केला होता.
महावितरण कंपनीने अरण, भेंड, वरवडे आणि सोलंकरवाडी या उपकेंद्रांमध्ये नवीन ५ एमव्हीए क्षमतेचे वाढीव ट्रान्सफॉर्मर बसविले असून परिते उपकेंद्रात १० एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवून उपकेंद्राची क्षमता वाढविण्यात आली आहे. तसेच वाढीव क्षमतेसाठी आवश्यक लिंक लाईनची कामे प्रस्तावित करण्यात आली असून त्यास लवकरच मंजुरी मिळून निविदा निघतील अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.सध्या सांघिक कार्यालयांच्या वेळापत्रकानुसार शेतीपंप वाहिन्यांवर सहा तास तीन फेज वीजपुरवठा सुरू असून शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील आहेत. शेटफळ उपकेंद्रावरील वाढता भार कमी करण्यासाठी मोडनिंब शहरातील काही भागाचा वीजपुरवठा सोलंकरवाडी उपकेंद्राशी जोडण्यात आला आहे.
दरम्यान, राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी तसेच महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत येत्या तीन ते चार दिवसांत बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होऊन कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.तथापि जनहिताचा विचार करून आणि प्रशासनाला सहकार्य करण्याच्या भूमिकेतून प्रस्तावित आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असले, तरी निश्चित कालावधीत संबंधित कामे पूर्ण न झाल्यास मोडनिंब गटातील शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी व नागरिकांच्या वतीने पुन्हा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कांबळे यांनी निवेदनातून दिला आहे.