सांगोला – सांगोल्यातील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व महाव्यवस्थापक, एसटी महामंडळ मुंबई सेंट्रल यांच्याकडे सांगोला आगारास १० जिजाऊ बस देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सांगोला येथे लांब पल्यासाठी १४-१५, मध्यम पल्यासाठी १६-१७ बसेस तसेच ग्रामीण भागासाठी व शालेय विद्यार्थ्यांसाठी साधारण २५ बसेसची आवश्यकता आहे. परंतु सद्या सांगोला आगारात उपलब्ध असलेल्या ५८ बसेसपैकी अनेक बसेस जुन्या झालेल्या असल्यामुळे त्या स्क्रॅपसाठी जात आहेत. यामुळे सांगोला आगारात प्रवाशांच्या मानाने बसेसची संख्या अंत्यत तोकडी आहे. या डेपोतील बसेसची संख्या, जुन्या झालेल्या बसेस नादुरुस्त होण्याचे वाढते प्रकार, ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांची विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेता सांगोला आगाराला कमीत कमी तातडीने जिजाऊ १० नवीन बसेस देण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.