बार्शी – शहरात साखळी चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. संकेश्वर बाग परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील १७ ग्रॅम, ४०० मिलीग्राम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सौ. नंदा महादेव दिवटे (वय ६३, रा. देशमुख प्लॉट, कुलकर्णी हॉस्पिटल शेजारी, उपळाई रोड, बार्शी) या आपल्या पतींसह शनिवार दि. २१ जून रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास त्या संकेश्वर बाग परिसरात पोहोचल्या असता, त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण जोराने हिसकावून घेतले आणि घटनास्थळावरून वेगाने पळ काढला.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे दिवटे यांनी आरडाओरडा केला. मात्र, तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. या झटापटीत त्यांच्या गळ्याला किरकोळ दुखापतही झाली. घटनेनंतर परिसरात शोधाशोध करूनही सोन्याचे गंठण मिळून आले नाही.
चोरीस गेलेले मिनी गंठण अंदाजे १७ ग्रॅम, ४०० मिलीग्रॅम वजनाचे असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी सौ. नंदा दिवटे यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोन चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
दरम्यान, शहरात वाढत्या साखळी चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी अशा घटनांना आळा घालण्यासाठी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Post Views: 14