सांगोला – मध्य रेल्वेच्या सोलापूर, पुणे विभागातून धावणाऱ्या रेल्वेला दररोज उशीर होत असल्याने प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत असून या सर्व रेल्वे वेळेवर चालवावेत अशी मागणी सांगोल्यातील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक सोलापूर व पुणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कलबुर्गी-कोल्हापूर सुपरफास्ट रेल्वे सातत्याने ३० ते ४० मिनिटे तसेच दादर-सातारा एक्सप्रेस देखील ४५ ते ५० मिनिटे कायम विलंबाने धावत असते. मिरज-कुर्डूवाडी पॅसेंजर या रेल्वेला कोणताच भरोसा नाही. धावली तरच वेळेवर धावते, अन्यथा क्रॉसिंग करिता अर्धा ते एक तास सांगोला, पंढरपूर, मोडलिंब या स्टेशनवर थांबून असते. यामुळे या भागातील दररोज प्रवास करणारे प्रवासी अक्षरशः कंटाळून गेले आहेत. नोकरदार, विद्यार्थी यांचे या अवेळीमुळे प्रचंड नुकसान होत आहे. तरी या रेल्वे सेवा वेळेवर चालवाव्यात अशी मागणी संघटनेने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.