सोलापूर – सोलापूरच्या पारंपरिक शारदीय नवरात्र महोत्सवाला यंदा अधिक व्यापक स्वरूप देण्याच्या दृष्टीने शहरातील भाजप नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे. शक्तिदेवीच्या घटस्थापना पूजेसह प्राणप्रतिष्ठापना मिरवणुकीस सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी उपस्थित राहावे, यासाठी नगरसेवक किसन जाधव, विनोद भोसले यांनी सोमवारी पुणे विभागीय कार्यालयात त्यांची संयुक्त भेट घेऊन निमंत्रण दिले.
सोलापूरचा नवरात्रोत्सव हा धार्मिक परंपरेसोबतच शहराच्या सांस्कृतिक आणि भक्तिमय वातावरणाचे दर्शन घडविणारा महत्त्वाचा उत्सव मानला जातो. घटस्थापनेपासून सुरू होणाऱ्या या उत्सवात शक्तिदेवीच्या उपासनेसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे पालकमंत्र्यांनी घटस्थापना पूजेत सहभागी व्हावे, अशी विनंती नगरसेवकांनी केली.
नवरात्रोत्सवाच्या काळात महाराष्ट्रासह परराज्यांतून मोठ्या संख्येने भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरकडे मार्गक्रमण करतात. सोलापूर हे या यात्रामार्गावरील महत्त्वाचे शहर असल्याने नवरात्रोत्सवाच्या काळात शहरातील धार्मिक वातावरणाला विशेष महत्त्व प्राप्त होते. कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवरही तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते.
या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या नवरात्रोत्सवात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीला विशेष महत्त्व आहे. नगरसेवकांनी दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करून पालकमंत्री गोरे यांनी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सोलापुरात उपस्थित राहण्याची ग्वाही दिल्याचे सांगण्यात आले.
नवरात्रोत्सवाच्या निमंत्रणासोबतच आगामी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटींमुळे भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या राजकीय हालचालींनाही वेग आल्याचे चित्र आहे.
चौकट
कौस्तुभ गावडे यांना विजयासाठी शुभेच्छा
दरम्यान, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांचीही नगरसेवक किसन जाधव, विनोद भोसले आणि बिजू प्रधाने यांनी भेट घेतली. आगामी निवडणुकीसाठी त्यांना शुभेच्छा देत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवावा, अशा सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
Post Views: 245