सोलापूर – मागील वर्षी जुन महिन्यात अपेक्षा पेक्षा जास्त पाऊस पडला मात्र यंदा जून महिना संपत आला असतानाही सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. काय करावं, काय करू नये याचं विवेंचनेत शेतकरी आहे, अपुऱ्या पावसाने जिरायती शेतीचे कामे करता येईना झालेत.ज्यांची बागायती आहें त्यांना पिकास पानी पुरेना झाल्याने चिंता वाढली आहे.शेतातील उभी पिके पाण्या अभावी
करपु लागलीत. मागील वर्षी अति पावसाने शेतकरी बेजार झाला. उभी पिके पाण्यात वाहून गेली आणि या वर्षी अद्याप पाऊसच पडला नसलेला शेतकरी, शेतमजूर,कामगार व्यापारी सर्वजणच हवालदिल झालेत. पावसाची चातकासारखी वाट बघू लागलेत. अशीच परस्थिती राहिली तर येणाऱ्या काळात परस्थिती गंभीर होऊ शकते याची भीती शेताकऱ्या सह सर्वसामान्यांना सतावू लागल्या आहेत.
यंदा नैऋत्य मान्सून विलंब लागल्यामुळे महाराष्ट्रासह मध्य भारतात पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार जूनच्या पहिल्या पंधरवड्यात देशभरात सुमारे ३५ टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली असून मध्य महाराष्ट्रात ही तूट ६० टक्क्यांहून अधिक असल्याचे दिसून येत आहे.
सोलापूर जिल्ह्यात साधारणपणे जून महिन्यात सरासरी १२० मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. मात्र यंदा अद्याप अनेक भागांत अपेक्षित पाऊस झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या असून शेतकरी पावसासाठी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत.
कृषी तज्ज्ञांच्या मते, पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी न करता पुरेसा ओलावा निर्माण होईपर्यंत प्रतीक्षा करावी. शेतातील तण नियंत्रण, बांधबंदिस्ती, नालाबांधणी, सरी-वरंबे तयार करणे, तसेच पावसाचे पाणी अडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे ही मशागतीची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. यामुळे पाऊस पडल्यानंतर जमिनीत ओलावा अधिक काळ टिकून राहण्यास मदत होईल.
जर पाऊस उशिरा आला किंवा कमी प्रमाणात झाला तर कमी कालावधीत येणारी व दुष्काळ सहनशील पिके निवडण्याचा सल्ला कृषी विभागाकडून दिला जात आहे. बाजरी, मूग, उडीद, तूर यांसारख्या पिकांच्या योग्य वाणांची निवड करावी. पेरणी करताना बियाण्यांची उगवणक्षमता तपासूनच वापर करावा. तसेच एकदम संपूर्ण क्षेत्रावर पेरणी करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने पेरणी केल्यास धोका कमी होऊ शकतो.
दरम्यान, हवामान विभागाने येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे जूनअखेर किंवा जुलैच्या प्रारंभी समाधानकारक पाऊस होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र तोपर्यंत शेतकऱ्यांनी संयम बाळगून कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नियोजन करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.



















