सांगोला – इतरांशी स्वतःची तुलना करण्यापेक्षा प्रयत्नांत सातत्य ठेवा. मोबाईलचा मोह टाळा. शिस्त, समर्पण आणि योग्य निर्णय या त्रिसूत्रीचा जीवनात अंगीकार करणे हाच यशाचा खरा मंत्र असल्याचे सांगून मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. ते सांगोला विद्यामंदिर ज्यु.कॉलेजमध्ये इ.१२ वी बोर्ड परीक्षा व एमएचटी-सीईटी मधील गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे व संस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, प्राचार्य चारुदत्त जगताप, उपमुख्याध्यापक प्रदीप धुकटे, उपप्राचार्य शिवशंकर तटाळे, पर्यवेक्षक काकासो नरूटे, शुभांगी घोंगडे, नाझरा विद्यामंदिरचे प्राचार्य अमोल गायकवाड उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना विद्यार्थी धीरज जगताप, स्नेहल बोधगिरे, दिपाली भोसले, श्रीकांत सातपुते आणि पालक रामेश्वर अवताडे यांनी संस्था, संस्थाध्यक्ष, पदाधिकारी, मार्गदर्शक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कार्याचा गौरव केला. या सोहळ्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चारुदत्त जगताप, सूत्रसंचालन प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले. आभार शिवशंकर तटाळे यांनी मानले.
चौकट-
जीवनाच्या प्रवासात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जा आणि कायम नव्या, दुप्पट उमेदीने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करा. आज यश संपादन केलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या पालकांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी पुढील शैक्षणिक वाटचालीतही हाच आत्मविश्वास कायम ठेवावा.
-प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, संस्थाध्यक्ष, सां.ता.शि.प्र.मंडळ, सांगोला