धाराशिव – कळंब पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी संतोष अनंतराव कोठावळे याला तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी मानवी हक्क अभियान जिल्हा धाराशिवच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आरोपीला अटक न झाल्यास न्याय हक्कासाठी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २६४/२०२६ अन्वये प्रकरण दाखल करण्यात आले आहे. संबंधित प्रकरणात आरोपी संतोष अनंतराव कोठावळे याच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप असून, गुन्हा दाखल होऊन अनेक दिवस उलटले तरी आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. आरोपीला अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
या प्रकरणात पोलिस प्रशासनाने तातडीने दखल घेऊन आरोपीला अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आरोपीला अटक न झाल्यास मानवी हक्क अभियानाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असेही निवेदनात म्हटले आहे.
हे निवेदन मानवी हक्क अभियानाचे जिल्हाध्यक्ष कैलास पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष श्रीकांत वाघे, जिल्हा संघटक अरुण माने, कार्याध्यक्ष खालिद पटेल, दलित महासंघाचे बाळासाहेब तुपसुंदरे, जिल्हा सल्लागार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Post Views: 18