पंढरपूर – राज्यातील अन्न व औषध प्रशासन विभाग सध्या चांगलच चर्चेत असून आयुक्त तुकाराम मुंढेंच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे विधिमंडळ अधिवेशनातही मुंढेंच्या कामाचा धडाका आणि कार्यवाहीचे कौतूक झाले आहे. त्यातच, यंदाच्या आषाढी यात्रा उत्सवातही तुकाराम मुंढे यांचा इफेक्ट दिसणार असून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तसे संकेत दिले आहेत.
आषाढी वारीच्या तयारी संदर्भात रविवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासनाची बैठक येथे पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी पालकमंत्र्यांनी संवाद साधला. त्यावेळी यात्रेच्या अनुषंगाने विविध विषयांवर पालकमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींना माहिती दिली.
————-
चौकट ( तुकाराम मुंढेंना करणार फोन )
बोलताना जयकुमार गोरे यांनी तुकाराम मुंढेंचा उल्लेख केला. आपण तुकाराम मुंडे यांच्याशी बोलणार असून आषाढी यात्रेत भाविकांना चांगले अन्नपदार्थ मिळावेत, अशा सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यात्रेच्या तयारीमध्ये पालखी मार्ग आणि पंढरपूर शहरात आषाढी यात्रा कालावधीमध्ये येणाऱ्या लाखो भाविकांना चांगले आणि स्वच्छ अन्नपदार्थ मिळावेत यासाठी अधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आले आहेत. याबाबत मी तुकाराम मुंढेंना बोलणार आहे, असे देखील गोरेंनी म्हटले आहे.
———————-
चौकट : ( भाविकांच्या सोयीसाठी ५ हजार बसेस )
आषाढी यात्रा काळात भाविकांच्या सुविधेसाठी परिवहन विभागाने तब्बल पाच हजार एसटी बसेस उपलब्ध करून दिल्या असून यावर्षी चांगल्यात चांगली सुविधा देण्याची कबुली परिवहन विभागाने दिल्याचे गोरे यांनी सांगितले.
———————-
चौकट : ( पालखी मार्गावर दहा हजार झाडे लावणार )
श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज या पालखी मार्गाची नव्याने निर्मिती झाल्यामुळे अनेक निवाऱ्याची झाडे रस्त्याच्या कामात पाडण्यात आली होती. यावर्षी जिल्हा परिषदेच्या कडून तब्बल दहा हजार झाडे पालखी मार्गावर लावण्याचा निर्णय झाल्याचे देखील पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
———————-
चौकट : ( चंद्रभागेत पाण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र )
आषाढी यात्रेसाठी चंद्रभागेत पाणी सोडण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले जाणार असल्याचे गोरे यांनी सांगितले.आषाढी वारीमध्ये लाखो भाविक पंढरपूरला येत असतात. मात्र, यंदा अलनिनोचे संकट असल्यामुळे पाण्यावर जरी निर्बंध असले. तरी वारकऱ्यांच्या सुविधेसाठी चंद्रभागा अर्थात भीमा नदीत पाणी सोडण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहोत. जेणेकरून लाखो वारकरी भक्तांची व्यवस्था होईल. राज्यात जरी पाणीटंचाई असली तरी पालखी मार्गावर पाण्याची कमतरता नाही, असेही जयकुमार गोरे यांनी सांगितले.
———————-
चौकट : ( अन्यथा मुर्ती संवर्धनाचे काम आषाढीनंतर )
श्री विठ्ठल रुक्मिणी मुर्ती जतन आणि संवर्धनाच्या कामाचा विषय न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाने जतन आणि संवर्धनाच्या कामाला परवानगी द्यावी अशी आम्ही विनंती करणार आहोत. आषाढीपूर्वी परवानगी मिळाली तर ठिक अन्यथा आषाढीनंतर आम्ही मुर्तीच्या जतन,संवर्धनाचे काम सुरु करु असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
———————-
चौकट : ( काँरिडाँरचे भूमिपूजन वारी नंतरच )
पंढरपूर काँरिडाँरला प्रशासकीय मंजुरी मिळाली असली तरी आषाढी वारी दरम्यान भूमिपूजन केले जाणार नाही. प्रथम बाधित मालमत्ताधारकांना योग्य मोबदला व पर्यायी व्यवस्था करुन त्यांचे समाधान केले जाईल. बाधितांना विश्वासात घेतल्या शिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नसल्याचे देखील पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.
———————
चौकट : ( जानेवारी पासून काँरिडाँरच्या कामास प्रारंभ )
वारकरी भाविकांना जास्तीत जास्त सेवासुविधा मिळाव्यात यासाठी काँरिडोर केला जाणार आहे. त्याचे काम जानेवारी पासून प्रत्यक्षात सुरु केला जाणार आहे. त्यामुळे यंदाची आषाढी यात्रा ही विद्यमान व्यवस्थेतील शेवटची यात्रा ठरणार आहे. पुढील वर्षीची आषाढी यात्रा काँरिडोर नंतरच्या पंढरपूर मध्ये भरणार आहे असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
———————
चौकट : ( मंदिर समितीच्या गैरव्यवहाराची चौकशी यात्रेनंतर )
आषाढी यात्रेनंतर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मधील कथीत गैरव्यवहाराची चौकशी करण्यात येईल अशी माहिती पालकमंत्र्यांनी रविवारी दिली. सध्या आषाढी यात्रेचे नियोजन सुरु असून यात्रा सुरळीत पार पडल्यानंतरच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाईल.
———————
चौकट : ( वारकरी महिलांसाठी सुविधा )
यंदा प्रथमच महिला वारकऱ्यांसाठी स्वतंत्र शौचालये, स्नानगृहे, आणि चेंजिंग रुमची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्रा अंतर्गत स्वतंत्र जर्मन हँगर, हिरकणीकक्ष आणि सँनिटरी पँड व्हेंडिंग मशीनची सुविधाही उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
Post Views: 12