
सोलापूर – लिटिल चॅम्प बारा वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात कादर विजापूर आणि हेमंत हबीब संघांनी शानदार कामगिरी करत अनुक्रमे ८ आणि ७ विकेट्सने दणदणीत विजय मिळवले.
जुळे सोलापूर येथील भंडारी मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात रामभाऊ देगावंकर संघाने प्रथम फलंदाजी करताना १७.१ षटकांत ९ बाद ८० धावा केल्या. ८१ धावांचे माफक लक्ष्य कादर विजापूर संघाने केवळ १०.१ षटकांत २ गडी गमावून पूर्ण केले आणि दमदार विजयाची नोंद केली. कादर विजापूर संघाचा गोलंदाज राजेश शिंदे याने ४ षटकांत २१ धावा देऊन ३ महत्त्वाचे बळी घेतले. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
दुसऱ्या सामन्यात अंबादास पवार संघाने प्रथम फलंदाजी करताना २२.५ षटकांत सर्वबाद ७८ धावा केल्या. प्रत्युत्तरात हेमंत हबीब संघाने संयमी आणि आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन करत १२.४ षटकांत ३ बाद ७९ धावा करत सहज विजय मिळवला. या सामन्यात वरद चिपडे याने अष्टपैलू कामगिरी केली. त्याने गोलंदाजीत ३ षटकांत ६ धावा देत ३ बळी घेतले आणि फलंदाजीत २८ चेंडूत ३ चौकारांसह नाबाद २१ धावा केल्या. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीबद्दल त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.



















